लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पांढरकवडा नगरपरिषदेवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने बाजी मारली आहे. पांढरकवडा नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली अभिनय नहाते तीन हजार २७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. नगरसेवकाच्या १९ पैकी १४ जागा जिंकून प्रहारने नगरपरिषदेवर बहुमतही मिळविले.पांढरकवडा नगरपरिषदेत यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला गेला. भाजपा व काँग्रेसमध्ये लढत होईल, असा राजकीय अंदाज असतानाच ‘प्रहार’च्या वैशाली नहाते यांनी प्रचंड मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. त्यांना पाच हजार ७८४ मते मिळाली. त्यांनी भाजपाच्या श्रद्धा अनिल तिवारी यांचा तीन हजार २७१ मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या राधिका संतोष बोरेले तिसºया तर काँग्रेसच्या गौरी शंकर बडे चौथ्या स्थानावर राहिल्या. त्यांना अनुक्रमे ३६८३ व २६९६ मते मिळाली. बसपा व अपक्ष उमेदवाराला मतांचे द्विशतकही गाठता आले नाही. विशेष असे ९० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती देत नगराध्यक्ष पदासाठी सहा पैकी एकही उमेदवार पात्र नसल्याचे संकेत दिले.पांढरकवडा नगरपरिषदेसाठी १४ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. गुरुवारी सकाळी १० वाजतापासून जिड्डेवार सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रहारच्या वैशाली नहाते यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेत ती शेवटपर्यंत कायम ठेवली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये प्रचंड राजकारण झाले. नियोजित व शब्द दिलेल्या उमेदवाराला नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या काही तासापूर्वी दगा-फटका झाला. ऐनवेळी श्रद्धा तिवारींच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. त्यामुळे नियोजित उमेदवाराच्या गटात प्रचंड नाराजी पसरली. या नाराजीचा फटका निकालातून दिसल्याचे मानले जाते. प्रहारच्या या विजयात काँग्रेस व भाजपातील एका गटाच्या नाराजीचा मोठा वाटा असल्याचेही बोलले जाते. नहाते यांना मुस्लीम व कुणबी-मराठा मतदारांचीही मोठी साथ लाभली.पांढरकवड्यातील नगराध्यक्षांची थेट जनतेतून झालेली ही निवडणूक भाजपासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची होती. कारण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे आमदार राजू तोडसाम, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीने पणाला लावली होती. या नेत्यांमध्येच तिकीटावरून बरेच घमासाम झाले. त्यातूनच हा विपरित निकाल भाजपाला पहावा लागल्याचे मानले जाते. प्रहारने ३०० किलोमीटर दूर येऊन पांढरकवड्यात भाजपाच्या नेत्यांना पराभवाची जोरदार चपराक दिली.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार गौरी शंकर बडे या चक्क चौथ्या स्थानी फेकला गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची होती. मात्र बडे यांच्यावरील नाराजी व त्यातूनच झालेल्या उघड बंडखोरीमुळे काँग्रेसला येथे पराभवच नव्हे तर चौथे स्थान स्वीकारावे लागले. काँग्रेससाठी आगामी विधानसभेच्या दृष्टीने हा पराभव पुन्हा धोक्याची तीव्र घंटा मानली जात आहे.शिवसेनेनेसुद्धा आधीच आपला उमेदवार निश्चित करून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेचे अनेक नेते पांढरकवड्यात तळ ठोकून होते. मात्र नवा चेहरा न दिल्याने शिवसेनेलाही पराभवाचा सामना करावा लागला.प्रस्थापितांना नाकारले, नव्या चेहऱ्याला संधीपांढरकवड्यातील जागरुक मतदारांनी भाजपा, शिवसेना व काँग्रेसच्या प्रस्थापितांना डावलून नव्या चेहºयाला संधी दिल्याचे स्पष्ट होते. हाच पॅटर्न आगामी निवडणुकांमध्ये कायम राहिल्यास लोकसभा व विधानसभेतसुद्धा विजयाची माळ नव्या चेहºयांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पांढरकवड्यातील नगराध्यक्ष पदाची ही थेट जनतेतून झालेली निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.
पांढरकवडा पालिकेवर ‘प्रहार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:10 PM
जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पांढरकवडा नगरपरिषदेवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने बाजी मारली आहे. पांढरकवडा नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली अभिनय नहाते तीन हजार २७१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
ठळक मुद्देनगराध्यक्षपदी वैशाली नहाते : भाजपा, काँग्रेस, शिवसेनेला धक्का