आमदारांची भेट : पुनर्वसनात सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन, घरकुल प्रश्नही सोडविणारनेर : गेली १५ वर्षांपासून निर्माणाधिन असलेल्या तालुक्यातील कोहळा प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा बुधवारी दहा आमदारांच्या समितीने जाणून घेतल्या. आमदार आशीष देशमुख यांच्या अध्यक्षतेत ही समिती दुपारी १२ वाजता कोहळा येथे दाखल झाली होती. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न दूर करण्याचे आश्वासन या समितीने दिले. आमदार वीरेंद्र जगताप, आमदार सूमनताई पाटील, आमदार संजीवकुमार रेड्डी, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार विलास पाटील, आमदार अशोक उईके, आमदार संजय बोदकुरवार, आमदार उल्हास पाटील, आमदार शांताराम मोरे आदींनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जाणले. कोहळा प्रकल्पाच्या कामाला २००२ मध्ये सुरुवात झाली. यासाठी पुनर्वसन करण्यात आले. मात्र नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. पुनर्वसनातील नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो. १४० नागरिकांना घरकूल मंजूर झाले. वाटप १०९ लोकांनाच करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पाण्याची समस्याही या नागरिकांना भेडसावते. कॅनॉल फुटल्यामुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नवीन भूसंपादन कायद्यानुसार मदत मिळाली नाही. अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष सुरू आहे. या व इतर समस्या नागरिकांनी समितीपुढे मांडल्या. (तालुका प्रतिनिधी)
कोहळा प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या समितीकडे व्यथा
By admin | Published: September 22, 2016 1:40 AM