रूपेश उत्तरवार - यवतमाळ सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. लांंबलेल्या पावसाने महागाईत भर घातली असून ग्राहकांच्या पिशव्या मात्र अर्ध्या रित्याच दिसत होत्या. यवतमाळ शहरासह लगतच्या गावांमधून अनेक जण आठवडाभराचे साहित्य खरेदी करण्यासाठी यवतमाळच्या आठवडीबाजारात येतात. पालेभाज्या, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तूची खरेदी केली जाते. मात्र गेल्या महिनाभरापासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या आठवडीबाजारात असलेले पालेभाज्यांचे भाव पाहता प्रत्येक जण किती ही महागाई असेच म्हणताना दिसत होते. वर्षभरातील सर्वाधिक दर या रविवारच्या बाजारात दिसून आले. त्याचा परिणाम खरेदीवर झाला. इच्छा असतानाही खरेदी करणे शक्य झाले नाही. १० ते २० रुपये किलोच्या भाज्या ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. १५ रुपये किलोचा कांदा २५ रुपये तर १० रुपये किलोचे टमाटर ८० रुपये किलो झाले आहे. ४० रुपये किलोचा सांभार १५० रुपयापर्यंत पोहोचला आहे. पाच रुपयात जुडीभर मिळणारा सांभार आता १० रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतही नाही. यवतमाळात नाशिकवरून पानकोबी, फुलकोबी आणि शिमला मिर्ची येते. मध्यप्रदेशातून टमाटर येतात तर नागपूर, खामगाव, संगमनेर येथून पालेभाज्या येतात. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. बाजारात केवळ वांगे, पालक आणि कोहळे ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे त्याच भाज्या खरेदीवर कल दिसत होता. परंतु त्याच त्या भाज्या खावून ग्राहक कंटाळल्याने नवीन भाजीचा शोध घेत होते. परंतु खिशाला परवडत नव्हते. पालेभाज्यांना पर्याय म्हणून डाळीची निवड केली जाते. मात्र या डाळीही कडाडल्या आहे. ज्वारीचे भावही वाढले असून गहू १४ ते १८ रुपये, ज्वारी २४ ते ३८ रुपये किलो आहे.
पालेभाज्या आवाक्याबाहेर
By admin | Published: July 21, 2014 12:22 AM