मनुष्य मनुष्याला दुरावत आहे. अशा स्थितीत मनुष्य एकाकी जीवन जगत आहे. पशू, पक्षी मात्र सोबत आनंदाने जगताना दिसत आहे. परंतु उन्हाळ्यात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहे. सर्व नाले, नद्या आटल्या आहे. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडत आहे.
नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही जाणीव बाण्गून येथील पक्षी मित्र सुनील पोतगंटवार यांनी तळणी चौफुलीवरुन जाणाऱ्या आर्णी, सावळी, यवतमाळ व घाटंजी या चारही मार्गावरील झाडांना पन्नासच्या जवळपास मातीच्या कुंड्या बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या चारही वाटेवरून येता, जाता पक्ष्यांना पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.