यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत लिपिकाला पोलिसांनी चक्क मंगळसूत्र चोरीच्या आरोपात अटक केली आहे. त्याने अलिकडेच झालेल्या चार गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्या घरातून चोरीतील ३७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सोमवारी (8 एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दर्शन सुभाष पाटील (31) रा. मोरे रेसिडेन्सी विश्वनाथ पार्क लोहारा ता. यवतमाळ असे या आरोपी लिपिकाचे नाव आहे. विशेष असे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने त्याची ड्युटी लावली होती. मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
दारव्हा रोडवरील दर्डानगर, कोल्हे ले-आऊट, भारती अपार्टमेंट, अयोध्यानगर या भागात गेल्या काही दिवसात मंगळसूत्र चोरीच्या चार घटना लागोपाठ घडल्या. त्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने या घटनांवर लक्ष केंद्रीत केले. वाहनांची तपासणी केली गेली. या तपासणीत लिपिक दर्शन पाटील अडकला. पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता विचारला असता त्याने वेगळाच सांगितला. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन खातरजमा केली असता हा याच भागात राहत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यातूनच मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा उलगडा झाला.
दर्शन याच्या जवळ युनिकॉर्न ही बाईक आहे. त्याचा नंबर एम.एच. 29-एजे-989 असा आहे. परंतु प्रत्यक्षात त्याने टाकलेला नंबर हा 999 असा दिसतो. घटनेच्यावेळी कुणाला आपला नंबर कळू नये हा या मागचा दर्शनचा हेतू होता. दर्शन एकटाच मंगळसूत्र चोरीचे गुन्हे करायचा, असे सांगितले जाते. मात्र याच्या टोळीत आणखी कोण सहभागी आहे, यापूर्वी त्याने कुठेकुठे गुन्हे केले, त्या चोरीतील ऐवज कुणाला विकला, ड्युटी सांभाळून हा या चोरीच्या घटना कसा करायचा आदी बाबींचा उलगडा अद्याप व्हायचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पंचायत समितीचा लिपिकच चोरीच्या गुन्ह्यात आरोपी निघाल्याने पोलीस यंत्रणेलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.