ढाणकी : उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी समस्यांबाबत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.
कोरोनाचा वाढता आलेख पाहून सभापतींनी आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. केंद्रात सोयी-सुविधा पुरवण्याकरिता वरिष्ठांना सूचना देत त्यांनी लवकरच ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय चालू होईल, अशी ग्वाही दिली. नोव्हेंबर महिन्यात नगरपंचायतीच्या पत्रावरून पंचायत समिती सभेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय करण्याचा ठराव जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविण्यात आला; परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.
त्रुटींची पूर्तता करणे सुरू आहे. त्यामुळे लवकरच आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन सर्व वैद्यकीय सुविधा मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरात स्वतंत्र ३० खाटांचे कोरोना कक्ष चालू करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जहीर जमीनदार, अमोल तुपेकर, ओमाराव पाटील, इरफान भाई यांनी केली.
बॉक्स
केंद्राचे वाहन भंगार अवस्थेत
येथील वाहन भंगार अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसतो. फार्मासिस्टचे पदही रिक्त आहे. ते त्वरित भरावे, औषधांचा तुटवडा भासू नये, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. आरोग्य सेविका भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे उपकेंद्रातील आरोग्य सेविकांकडून लसीकरण केले जात आहे.