यवतमाळ : स्मार्ट कार्ड नसेल, तर सवलतीत प्रवास करता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला होता. मात्र, पंढरपूर यात्रा डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डशिवाय सवलतीत प्रवासाची मुभा मिळणार आहे.
एसटी महामंडळाकडून विविध घटकांतील नागरिकांना प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर आणि पाच महिने चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे स्मार्ट कार्डची नोंदणी आणि वितरण थांबले होते.
आता एसटीची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर स्मार्ट कार्डची नोंदणी आणि नूतनीकरणाच्या कामालाही गती देण्यात आली आहे. त्यामुळेच ३० जूननंतर स्मार्ट कार्डशिवाय प्रवास करता येणार नाही, असे महामंडळाकडून सांगितले गेले. आता मात्र केवळ ज्येष्ठ नागरिकांना दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूरवारी सवलतीच्या दरातच स्मार्ट कार्डशिवाय करता येणार आहे.
नोंदणी झाली, पण कार्ड पडून
स्मार्ट कार्ड योजना सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या लगबगीने नोंदणी केली. कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या आधीच त्यांची रांग लागून राहात हाेती. परंतु महामंडळाकडे अजूनही अनेकांचे कार्ड पडून आहेत. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास तो दुसऱ्याच व्यक्तीचा निघतो. ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली आहे, त्यांनी संपर्क करून ते उपलब्ध करून घेता येणार आहे.
दरवर्षी नूतनीकरण
स्मार्ट कार्डचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. यानंतरही यात सातत्य ठेवले जाते. यासाठी महामंडळाच्या कार्यालयात सोय करून देण्यात आली आहे. शिवाय, नवीन कार्डसाठी नोंदणीही करण्यात येत आहे.