तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे, तसेच सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे काही गावात दारूबंदी आहे, तर दुसरीकडे जवळील महामार्गावर, राज्य मार्गावर अनेक ढाब्यावर, हॉटेलमध्ये हजारो रुपयांची विनापरवाना दारूमुळे किमतीच्या दुप्पट विक्री केली जात आहे. यामुळे गावठीसह देशी दारूचा व्यवसायही जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू करून अनेकांनी उच्छाद मांडला आहे. अवैध दारू व्यावसायिक यात मालामाल होतानाही दिसत आहे. तालुक्यात चोरट्या मार्गाने दारूमाफिया दारूसाठा उपलब्ध करीत आहेत. काही गावांमधून गावठी दारू व पांढरकवडा येथून देशी दारू दुचाकी व चारचाकी वाहनाद्वारे इतर ठिकाणच्या अवैध व्यावसायिकाकडे पोहोचविल्या जात आहे. काही गावांत तर नियमितपणे दररोज ही अवैध दारू पोहोचविल्या जात आहे. ही दारू कोठून येते व कुठे कुठे जाते, याची संपूर्ण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे, परंतु याकडे हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे, तर उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच अनेक अवैध दारू व्यावसायिकांची हिंमत वाढल्याचेही सांगितले जात आहे. अवैध व्यावसायिक व अधिकाऱ्यांमध्ये अर्थकारण असल्याचा आरोप आहे. तालुक्यात अनेक गावांत ठिकठिकाणी महिला बचत गटाच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ठराव घेतले असले, तरी अशा दारू विक्रीमुळे महिलांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कमी वेळात व कमी श्रमात श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण या गावठी दारू व देशी दारूच्या अवैध व्यवसायात उतरले आहेत. दारू अधिक प्रभावी व्हावी, यासाठी अनेक घातक पदार्थही मिसळले जात असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांना असाध्य अशा विविध आजारांनी ग्रासले आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
पांढरकवडा तालुक्यात ‘गावठी, देशी’ दारूची विक्री जोरात, दारूबंदी नावालाच : राजरोस विक्री, उत्पादन शुल्क विभागही सध्या चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:40 AM