ढाणकी : पावसाळ्याला सुरुवात होताच पैनगंगा अभयारण्य विविध नैसर्गिक समृद्धीने नटले आहे. त्यामुळे अभयारण्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ख्याती असलेल्या पैनगंगा अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, हरण, रान कुत्रे, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा वावर आहे. आता अभयारण्यात जंगल सफारी सुरू झाल्याने हे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी पाणवठे, सोलर सिस्टिम, कुरण संगोपन यांसारखी कामे करून वन्यजीवांना अभय प्राप्त करून देण्यात आले आहे.
लाकडांची तस्करी थांबविण्यासाठी चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लाकूड तस्करीला आळा बसला आहे. रात्रीला होणारी अभयारण्य क्षेत्रातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण प्राप्त झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर आणि सहकारी अभयारण्याची काळजी घेत आहेत.
बॉक्स
१२० युवकांना चालक प्रशिक्षण
अभयारण्यात ३० गावांचा समावेश आहे. या गावातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून १२० युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना परवाना काढून देण्यात आला. युवकांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले. आता पर्यटकांसाठी प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर विश्रांती थांबे तयार केले जाणार आहेत.
कोट
पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सहकाऱ्यांसह परिश्रम घेत आहोत. भविष्यात स्थानिकांना रोजगार मिळावा, हाच उद्देश आहे. ताडोबासारखे पर्यटक पैनगंगा अभयारण्याला भेट देतील, असा विश्वास आहे.
ओमप्रकाश पेंदोर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, बीटरगाव