यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचलदेव) येथील एक ६४ वर्षीय इसम नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे ढाणकी, फुलसावंगी, विडूळ, धानोरा व माहूरमध्ये ही सर्व गावे दहशतीत सापडली आहे.
उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचलदेव) येथील एका ६४ वर्षीय इसमाला काही दिवसांपासून सर्दी, खोकल्याचा त्रास होता. सदर इसमाने ढाणकी येथे काही दिवसांपूर्वी दोन डॉक्टरांकडे तपासणी केली. मात्र आजार बरा झाला नाही. त्यामुळे सदर इसम दूध संकलनाच्या एका वाहनातून ६ मे रोजी माहूर तालुक्यातील मालवाडा येथील आपल्या मुलीकडे गेला. त्यांनी दूधाच्या वाहनाने धनोडा मार्गे माहूरमध्ये प्रवेश केला. तेथे जावयाने त्यांना दुचाकीवरून ७ मे रोजी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन. भोसले यांनी सदर इसमाला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. ८ मे रोजी त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. ९ मे रोजी माहूर प्रशासनाला सदर रुग्णाचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, बीडीओ विशालसिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन. भोसले यांनी दिली. त्यामुळे माहूरसह ढाणकी, विडूळ, फुलसावंगी व धानोरा येथे दहशत निर्माण झाली आहे.
सदर बाधित रुग्णाची एक मुलगी महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे दिली आहे. ही मुलगी वडिलांच्या घरून ३० एप्रिल रोजी फुलसावंगीला परत आली. त्यामुळे फुलसावंगीमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण पाच नातेवाईकांना यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाने आयसोलेशन वॉर्डात पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. दरम्यान, रविवारी आरोग्य विभागाने धानोरा येथील ६२ नागरिकांना शाळेत निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. उमरखेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दादासाहेब ढगे सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनीही रविवारी दुपारी धानोरा येथे भेट देवून आरोग्य यंत्रणेला विविध निर्देश दिले.
ढाणकी दोन दिवस कडकडीत बंदधानोरा येथील बाधित रुग्णाने ढाणकी येथील दोन डॉक्टरांकडे काही दिवसांपूर्वी तपासणी केली होती. त्यामुळे ढाणकी शहरात दहशत निर्माण झाली आहे. संबंधित डॉक्टरांसह नागरिक दहशतीत आहे. त्यामुळे गावकºयांनी ११ व १२ मे रोजी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस गावातील कोणतेही दुकान उघडले जाणार नाही. ढाणकी येथून धानोरा हे गाव जवळपास आठ किलोमीटर तर विडूळ येथून चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ढाणकी व विडूळवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय फुलसावंगी व धानोरामध्येही दहशत निर्माण झाली आहे. माहूर येथील सदर इसमाचा जावई भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे माहूरच्या भाजीपाला बाजारातही खळबळ उडाली आहे. सदर बाधित रुग्णाला नांदेड येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.