मारेगाव : राज्य शासनाने परधान समाजाला आरक्षणातून वगळण्यासाठी घाट घातल्याचा आरोप करीत तालुक्यातील परधान समाजबांधवांनी शनिवारी मोर्चा काढून निषेध नोंदविला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या यादीतील १७ जमातींपैकी परधान जमातीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिल्याची माहिती आहे. मात्र या निर्णयामुळे परधान समाजबांधवांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. समाजावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप आदिवास परधान समाज कृती समितीने केला आहे. येथील नगरपंचायतीजवळून मोर्चा निघाला. तहसीलमध्ये पोहोचल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी गीत घोष, वामनराव सिडाम, शंकर मडावी, कीरण कुमरे, दत्ता मालगडे, सुनील गेडाम, सुरेखा भादीकर, बी.डी.आडे, रेखा मडावी, उत्तम कुमरे यांनी सभेत मार्गदर्शन केले. तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात तुषार आत्राम, संजय आत्राम, श्रीकृष्ण कुमरे आदी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)
मारेगाव येथे परधान बांधवांचा मोर्चा
By admin | Published: November 22, 2015 2:41 AM