गाव तेथे रस्ता, शाळा हे शासनाचे धोरण असताना याला अपवाद मात्र तालुक्यातील वरूड पारधी बेडा ठरले आहे. वरूडपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पारधी बेड्यावर जाण्या-येण्यासाठी स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेल्यावरही या गावासाठी रस्ता मिळाला नाही. त्यामुळे पारधी बेड्यावर वास्तव्यास असणाऱ्या पारधी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेड्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पावसाळ्यात अक्षरशः चिखल तुडवत जावे लागते. एखाद्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतात. प्रसूतीसुद्धा रस्त्यातच झाल्याचे रहिवासी सांगतात. हा मार्ग बैलबंडीचा असल्याने पावसाळ्यात प्रचंड चिखल होत असल्याने चिखलातून वाट शोधत मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनते. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, परंतु रस्त्याचा प्रश्न अद्यापही कायमच आहे. त्यामुळे या बेड्यावरील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
वरूडच्या पारधी बांधवांना अद्यापही रस्त्याची प्रतीक्षाच, चिखलातून शोधावी लागते वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:49 AM