आॅनलाईन लोकमतकळंब : ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ती अशी, ‘सांग पाटला काय करु, उपड पऱ्हाटी पेर गहू’. अशीच अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे. ही अवस्था बीटी कपाशीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी बोंडअळीचा प्रादूर्भाव झालेल्या पऱ्हाटीवर ट्रॅक्टर फिरवित आहे.कळंब तालुक्यात बहुतेकांच्या शेतात गुलाबी बोंडअळीने कहर केला आहे. काहींची शेतीच्या-शेती अळीने फस्त केली. असे एकही शेत सुटले नाही, जिथे अळीचा प्रादूर्भाव नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. लाखो रुपये खर्च करून एकही रुपयाची मिळकत मिळालेली नाही आणि येत्या काळात मिळण्याची शक्यताही नाही. त्यामुळे कपाशीच्या उभ्या पिकात जनावरे चारणे, ट्रॅक्टर फिरविणे असे प्रकार सर्रास सुरु आहेत. कपाशीच्या प्रत्येक बोंडात अळी आहे. वरून बोंड जरी चांगले दिसत असले तरी त्यातून कापूस फुटणार नाही, हे आता उघड झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पऱ्हाटी उपटून गहू अथवा हरबरा लावण्याची लगबग सुुरु केली आहे. परंतु यातून कपाशीचे नुकसान कदापिही भरुन निघणारे नाही.तालुक्यातील महादेव काळे, शंकर इंगोले, महेश ढोले, नथ्थू सोनाळे, आनंदराव जगताप, सुभाष भगत, सुधाकर मोहनापूरे, वसंत ठाकरे यांच्यासह अनेकांची शेती अळ्यांनी फस्त केली. काहींनी कपाशी उपडणे सुरु केले आहे. आता या ठिकाणी गहू अथवा हरभरा लावून चार पैसे मिळकत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु लाखो रुपयांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई कोण आणि कशी देणार, हा प्रश्न आहे. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला.
पऱ्हाटीवर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 9:53 PM
ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ती अशी, ‘सांग पाटला काय करु, उपड पऱ्हाटी पेर गहू’. अशीच अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे.
ठळक मुद्देलाखोंचा खर्च पाण्यात : बोगस बियाण्यांमुळे शेतकरी त्रस्त