महागाव : तालुक्यातील गुंज ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर दहा विरुद्ध ४ मताने पारित करण्यात आला. सदस्यांना विकास कामात सहभागी करून घेत नाही, मनमानी कारभार करतात असा ठपका ठेवत हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. सरपंच श्याम गंगाळे यांच्याविरुद्ध १२ एप्रिल रोजी नऊ सदस्यांनी तहसीलदार ईसाळकर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्यावर बुधवार १९ एप्रिल रोजी सभा बोलाविण्यात आली. गुंज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दुपारी ही विशेष सभेत हा ठराव मांडण्यात आला. त्यावेळी दहा सदस्यांनी हात उंच करून सरपंचाच्या विरोधात मतदान केले. सरपंच श्याम गंगाळे सदस्यांना विश्वासात घेत नाही, आर्थिक व्यवहारात मनमानी करतात, मासिक सभा घेत नाही, असे विविध आरोप ठेऊन हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यावेळी उपसरपंच वसंत शंकर भोने, सदस्य कौशल्या वसंत भोने, निरंजन रघुनाथ बोरगडे, विमल विठ्ठल कांबळे, काळूराम गोपाल जाधव, सुभाष देवला राठोड, दीपक बळीराम राठोड, फरजाना शे. अफसर, शकुंतला विश्वनाथ हाके, इंदूबाई मधुकर श्यामसुंदर, पंडित गोविंद कांबळे, सीमा गजानन फाळके, नंद गणेश तोडक, चंद्रभागा दत्ता काळे आदी उपस्थित होते. तहसीलदार नारायण इसाळकर यांनी ठराव पारित झाल्याचे घोषित केले. यावेळी नायब तहसीलदार गजानन कदम, तलाठी जाधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गुंजच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारित
By admin | Published: April 20, 2017 12:33 AM