लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : १५ आॅगस्टला येथील समाजमंदिराच्या परिसरात असलेल्या शहिद बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाने बॅनर लावले होते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. याबाबत दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ठाणेदारांकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र दोषींविरोधात अद्यापही कारवाई न करण्यात आल्याने बिरसा ब्रिगेड व आदिवासी एकता समितीतर्फे शनिवारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मोर्चा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर पोहोचताच तेथे एक सभा घेण्यात आली. या सभेत संभा मडावी, आदिवासी नेते बंडू सोयाम, अशोक गिरडकर, चंद्रशेखर सिडाम, भाऊराव मरापे, रितेश परचाके यांनी मार्गदर्शन केले. सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी व ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सेवानिवृत्त ठाणेदार चंदनसिंह बयास यांनी समन्वयाकरिता मोलाची भूमिका बजावली. या मोर्चात बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोतीष सिडाम, मनसेचे किशोर कनाके, अक्षय सिडाम, अमोल किनाके, दत्ता येरमे, रवी कुमरे सहभागी झाले होते.
पाटणबोरीत रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:04 PM