युवा शेतकरी : चिचगावच्या परमानंदने विविध प्रयोगातून दिली शेतीच्या विकासाची दिशा किशोर वंजारी नेर तालुक्याच्या चिचगाव येथील युवा शेतकरी परमानंद वानखडे व त्याची पत्नी रूपाली यांनी सुधारित तंत्रज्ञानाची जोड देवून तूर व कपाशीचे भरघोस उत्पादन घेतले. परिश्रम आणि कष्टातून त्यांनी आर्थिक समृद्धी साधली. योग्य व्यवस्थापनातून उत्पन्नासोबतच विक्रीची हातोटी जमल्याने अल्पावधितच त्यांनी विकास साधला आहे. चिचगावला जाताना परमानंदची आठ एकर शेती लक्ष वेधून घेते. त्याच्या शेतात बहरलेली तूर आणि कापूस परिश्रमातून फुललेल्या शेतीची साक्ष देते. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या परमानंदने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जीत शेतीकडे लक्ष घातले. सुरुवातीला तीन वर्षे कोरडवाहू शेती केल्यानंतर ओलिताच्या दिशेने त्याने पाऊल टाकले. यासाठी शेतात बोअर घेतले. त्याला चांगले पाणीही लागले. त्यामुळे परमानंदचा उत्साह वाढत गेला. ठिबकची व्यवस्था केली. वन्यजीवांचा त्रास होवू नये म्हणून काटेरी तारांचे कुंपन घातले. शेतातून विविध प्रकारचे उत्पन्न काढण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. यासाठी पत्नी रूपाली आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही साथ मिळत गेली. खरबूज, कलिंगड घेण्याचा प्रयोगही यशस्वी केला. केवळ तीन एकरात ५० क्विंटल कापूस आणि तेवढ्याच शेतात ५० क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया त्याने साधली. ठिबक सिंचनाला पॉली मल्चींगची जोड दिली. त्यामुळे पीक तणमुक्त झाले. या मल्चींगवर सुरुवातीला टरबूज, नंतर कापूस व तूर घेतली जाते. तूर मोठी झाल्यानंतर त्याची फुटवे काढले जाते. यामुळे झाडाला फांद्या वाढतात. परिणामी ही तूर बहरते. डवरणी, निंदन करावे लागत नाही. मागील दोन वर्षांपासून तो ५० हजार रुपये खर्चातून दोन लाख रुपयांच्या तुरीचे उत्पन्न घेत आहे. दोन एकर पऱ्हाटीला ३० हजार रुपये खर्च लावून ५० क्विंटल कापसाचे उत्पादन घेत असल्याचा दावाही त्याने केला आहे. काही वर्षांपूर्वी टँकरने पिकाला पाणी देणारा परमानंद आता नियोजनातून जमिनीतून मोती पिकवित आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे उत्पादन क्षमता घटते. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन चांगले हवे, असा त्याचा सल्ला आहे. कीडलेली, वेडीवाकडी फळे तोडून नष्ट करावी, शेतात माफक ओलावा राखला जावा, असे त्याचे मत आहे. बरेचदा फळे एकाच जागी राहिल्याने मातीशी संपर्क येतो. पॉली मल्चींगमुळे फळाचा ओल्या मातीशी थेट संपर्क येत नाही. या व इतर प्रयोगातून शेती उत्पादन वाढते, असे तो सांगतो. शेताच्या बांधावर आंबा, फणस आदी प्रकारची झाडे लावून अधिक उत्पादन घेत असल्याचे परमानंदने सांगितले. नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग शेतात केल्यास आर्थिक समृद्धी साधली जाते, असा विश्वास त्याला आहे.
परिश्रमातून गवसला समृद्धीचा मार्ग
By admin | Published: January 04, 2017 12:17 AM