नेर : शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर पूर्णवेळ उपस्थित राहावा, अशी अपेक्षा असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण आधी आणि डॉक्टर नंतर अशी स्थिती आहे. तापाने फणफणत असलेल्या रुग्णाला डॉक्टर येईपर्यंत तपासणी आणि उपचारापासून वंचित राहावे लागते. याशिवाय इतर प्रकारच्या रुग्णांना तर केव्हा तपासणी होईल यासाठी कितीतरी वेळ प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे तर येथील रुग्णालयात कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. याचा त्रास रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होतो. सदर रुग्णालयाला विविध प्रकारच्या समस्यांनी वेढले आहे. रुग्णवाहिका गेली कित्येक महिन्यांपासून आजारी आहे. तालुक्यासाठी उपलब्ध असलेली ही रुग्णवाहिका कधीच आॅनलाईन राहात नाही. या रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण इतर ठिकाणी हलविताना दोन डॉक्टर आणि दोन परिचारिका आवश्यक आहे. मात्र असे कधीही घडले नाही. एकंदर या तालुक्यात रुग्णसेवेचा फज्जा उडाला आहे.या रुग्णालयामध्ये अनेक आजारांवरील औषधांचा तुटवडा आहे. यात रुग्णांची हेळसांड होते. रुग्णालयात दाखल रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगू नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र ही बाबही दुर्लक्षित केली जात आहे. औषधसाठा पुरेसा नसल्यास तत्काळ उपलब्ध व्हावा यासाठी काही रकमेची तरतूद आरोग्य विभागामार्फत केली जाते. मात्र येथील शासकीय रुग्णालयाला ही रक्कम अजूनही मिळालेली नाही. येथील शवचिकित्सागृहाची अवस्थाही बिकट आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेहावरील कापड, शवचिकित्सा करणाऱ्या कर्मचाऱ्याने वापरलेले प्लास्टिक साहित्य जाळून नष्ट करायला पाहिजे. मात्र या बाबी कधीही होत नाही. शवचिकित्सागृहात मृतांवरील कपड्यांचे ढीग आहे. परिणामी या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. शवचिकित्सेनंतर घेतलेला नमुना एका डब्यात घेवून संबंधितांकडे सोपविला जातो. येथे मात्र हे डबे बेवारस पडून असल्याचे चित्र आहे. रुग्णालयाच्या कामकाजात कुठलीही सुसुत्रता नाही. कोणत्यावेळी कोणता डॉक्टर गैरहजर राहील याचा नेम नाही. जिल्हा आरोग्य विभागही जनतेच्या तक्रारींचे निवारण करत नाही. अशीच काहीशी अवस्था येथील डोळ्याच्या दवाखान्याची आहे. गेली १५ दिवसांपासून रुग्ण परत जात असल्याचे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांना विचारले असता, त्यांनी जणू आपला रुग्णालयाशी कुठलाही संबंध नाही, असे उत्तर दिले. शवचिकित्सागृहासंदर्भात विचारले असता सफाई कामगारांना साफसफाईविषयी सूचना दिली आहे, असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. यावरून या रुग्णालयाचा करभार कसा चालतो हे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
रुग्ण आधी, डॉक्टर नंतर
By admin | Published: July 05, 2014 1:39 AM