यवतमाळ : टीईटीच्या अटीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर शिक्षण संचालकांनी आता पदोन्नतीसाठी टीईटी लागू नसल्याबाबतचे मार्गदर्शनपर पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व राज्यातील हजारो शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये विषय शिक्षक पदस्थापनेचा प्रश्न मागील चार-पाच वर्षांपासून रखडला होता. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह सर्व संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली. तर ५ जानेवारी रोजी शिक्षक समन्वय महासंघाने जिल्हा परिषदेपुढे एक दिवसीय धरणे आंदोलनही केले. या धरणे आंदोलनाच्या वेळेस शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, विषय शिक्षक पदोन्नतीकरिता टीईटीची अट शिथिल करण्यात आल्याचे शिक्षण संचालकांचे पत्र असल्याशिवाय पदोन्नती करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
या अनुषंगाने सर्व संघटना समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष मधुकर काठोळे व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार यांनी पुणे येथे शिक्षण संचालकांकडे धाव घेतली. शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना पदोन्नतीबाबत निवेदन दिले. या निवेदनाची शिक्षण संचालकांनी तात्काळ दखल घेत ११ जानेवारी रोजी विषय शिक्षक पदोन्नतीकरिता टीईटीची अट शिथिल करण्यात आल्याचे पत्र निर्गमित केले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला.
यवतमाळात ६३० जणांना बढतीची संधी
यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये ६३० शिक्षकांची आता विषय शिक्षक म्हणून पदोन्नती होण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. संचालकांनी पत्र दिल्यामुळे आता विषय शिक्षक पदोन्नती तात्काळ करावी, अशी मागणी शिक्षक संघाचे नेते मधुकर काठोळे, जिल्हाध्यक्ष राजेश उदार, सरचिटणीस विठ्ठलदास आरु व समन्वय महासंघाच्या वतीने किरण मानकर, रमाकांत मोहरकर यांनी केली आहे.
संचालकांच्या पत्रात काय म्हटले?
शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार, १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वीची नियुक्ती असलेल्या शिक्षकांना वेतोन्नती देताना टीईटीची अट शिथिल करण्यात आली आहे. परंतु अशा शिक्षकांनी एनसीटीईने विहित केलेली शैक्षणिक, व्यावसायिक अहर्ता (टीईटी वगळता) धारण केलेली असणे बंधनकारक आहे.