‘लोकमत’चा दणका : स्वच्छतेची पाहणी यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाजवळील पुरूषांच्या प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर शनिवारी सकाळीच ते ‘देशी पव्वे’ गायब झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेतील दुसऱ्या माळ्यावरील पाणी पुरवठा विभागानजिकच्या पुरूष प्रसाधन गृहाच्या भींतीवर ‘देशी’चे रिकामे पव्वे पडून असल्याचे वृत्त प्राकशित केले होते. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने शनिवारी सकाळीच तेथून पव्वे हटविण्याच्या सूचना दिल्या. काही क्षणातच सर्व पव्वे तेथून गायब झाल्याचे शनिवारी आढळून आले. खुद्द सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही माळ्यांवर फेरफटका मारून स्वच्छतेची पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड यांनी फेरफटका मारल्याचे नाकारले. मोहोड यांनी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ‘ते’ पव्वे उचलण्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचित केल्याचे सांगितले. दरम्यान शुक्रवारी याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारणा केली असता, जिल्हा परिषदेच्या वास्तूची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचे काम बांधकाम विभागाचे असल्याचे सांगितले होते. तसेच पाणी पुरवठा विभागाचीच प्रसाधनगृहातील स्वच्छतेची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट केले होते. पाणी पुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडे अंगुली निर्देश केला होता. देखभाल आणि दुरूस्तीची सर्व जबाबदारी बांधकामचीच असल्याचे या विभागाने म्हटले होते. त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला होता. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील ‘पव्वे’ सकाळीच गायब
By admin | Published: July 17, 2016 12:42 AM