रोहयो मजूर संकटात : कुटंबावर उपासमारीची वेळमारेगाव : रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील मारेगाव-मार्डी व करणवाडी-कुंभा या रस्त्यावर दुतर्फी वृक्ष लागवड योजनेवर काम करणाऱ्या मजुरांचे मार्च महिन्यापासून वेतन न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे़ शासनातर्फे ‘मागेल त्याला रोजगार’, ही रोजगाराची हमी देणारी योजना राबविण्यात येते़ त्यानुसार तालुक्यात वन विभागातर्फे करणवाडी-कुंभा आणि मारेगाव-मार्डी या रस्त्यावर रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांमार्फत दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही या मजुरांवर सोपविण्यात आली आहे़ परंतु मजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केल्यानंतर कधीही वेळेवर मजुरी मिळत नाही़ तहसील कार्यालयात काम करणारे आॅपरेटर नियमित मस्टर भरत नाही़ विविध कारणे सांगून टाळाटाळ करतात़ त्याची झळ या मजूर वर्गाला बसत आहे़ या योजनेने मजुरांना रोजगाराची हमी देण्यात आली आहे. मागेल त्याला काम मिळणे सोपे झाले आहे. मात्र मजुरी वेळेवर मिळत नसल्याने अनेक मजूर आता या योजनेला कंटाळले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या त्रासामुळे अनेक मजूर आता घरी बसणे पसंत करीत आहे. परिणामी शासनाची ही योजनाच आता कचाट्यात सापडली आहे. कामे आहेत, मजूरही आहेत, मात्र तरीही मजूर मिळत नाही, अशी या योजनेची स्थिती झाली आहे.मजुरी वेळेवर मिळत नसल्याने आता तर अनेक मजूर रोहयोच्या कामावर जायला तयार होत नाही़ तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून या मजुरांचे वेतनच देण्यात आले नाही. मजुरांनी वेतनासाठी येथील तहसीलमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जाते़ रोहयोवर असाच पगार होतो, काम करायचे असेल तर करा, नाहीतर घरी बसा, असे त्यांना धमकाविले जात असल्याचे काही मजुरांनीच सांगितले. तहसीलमधील या कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे मजूर उपासमारीच्या मार्गावर आहेत. काम करूनही मजुरी मिळत नसल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे. (शहर प्रतिनिधी)
चार महिन्यांपासून वेतनच झाले नाही
By admin | Published: July 12, 2014 11:55 PM