दारू दुकाने बंदीचा परिणाम : दुकाने पुन्हा सुरू न करण्याची मागणी वणी : तालुक्याची दक्षिण-पूर्व सीमा ही चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहे. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली अन् त्याचा परिणाम वणी तालुक्याच्या सीमावर्ती भागातील शांततेवर झाला. या भागातील दारू दुकानांमध्ये प्रचंड रेलचेल सुरू झाली. जणू काही या भागातील शांतताच भंग पावत असल्याचे पहायला मिळत होते. पोलिसांवरील ताण वाढला. मात्र त्याच प्रमाणात वरकमाईच्या वाटाही वाढल्या. वणी तालुका जणू काही चंद्रपूरसाठी दारूचे निर्यात केंद्र बनले. मात्र यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी विभागातील १४ दारू दुकानांचे परवाने रद्द करून वणी विभागाला न्याय दिला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वणी विभागातील दारू दुकानांची उलाढाल नेत्रदीपक होती. हॉटेल व दारू दुकानात ग्राहकांच्या रांगा दिसत नव्हत्या. मात्र महिन्याचा दारूचा खप मागील काही वर्षीचे उच्चांक मोडणारा दिसत होता. त्यामुळे वणी विभागातून दारूचा महापूर चंद्रपूरकडे वाहतो आहे, हे अडाण्यालाही समजण्यासारखे होते. याचा सर्वात मोठा फटका गावागावातील महिलांना बसत होता. काही गावांमध्ये तर परिस्थिती एवढी गंभीर होती की, महिलांना घराबाहेर पडणेही जोखमिचे बनले होते. त्यामुळे चारगाव, साखरा, पुनवट येथील महिलांनी एकजूट करून गावातील दारू दुकान बंद करण्यासाठी लढा दिला. मात्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी महिलांच्या भावनेचा अनादर करून दारू दुकानांना अभय दिले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक दारू वणी विभागातून येत असल्याचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल होता. त्यावरून यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी वणीतील सर्व दारू दुकानांचा होणारा मासिक खप राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागितला. तेव्हा दारू दुकानांचा मासिक खप पाहून जिल्हाधिकारी अवाक् झाले. त्यांनी वणी विभागातील १५ दारू दुकानांच्या चालकांना याचा जबाब मागितला. दुकानदारांची सुनावणी घेतली. मात्र दुकानदारांजवळ खपाच्या उच्चांकाची ठोस करणे नव्हती. या दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होत असावा, असा संशय वाढला आणि त्यावरून वणी विभागातील १४ दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काढला. यात वणीतील वरलक्ष्मी ट्रेडर्स, संजय ट्रेडर्स, पार्थ वाईन शॉप, एन.के.देरकर, लालगुडा येथील डी.डी.एस.बार, माथोली येथील गितांजली बार, साखरा येथील सनराईज बार, भालर येथील दीपक ट्रेडर्स, राजूर येथील के.पी.जयस्वाल, चिखलगाव येथील सी.एम.जयस्वाल या दुकानांचा समावेश आहे. मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील ए.एन.ठाकरे, मार्डी येथील पी.जे.जयस्वाल, मारेगाव येथील पी.पी.जयस्वाल, झरी तालुक्यातील मुकुटबन येथील एस.एच.नक्षिणे यांच्या दुकानांना टाळे लागले आहे. मार्डी येथील पी.ए.गोतापल्लीवार यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याने गावकरी व महिला जिल्हाधिकाऱ्याप्रती आभार व्यक्त करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सीमावर्ती भागात पसरली शांतता
By admin | Published: August 20, 2016 12:27 AM