चार डॉक्टर गंभीर : उमरखेडच्या सुकळी गावाजवळ कारला धडक उमरखेड : अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात उमरखेड येथील बालरोग तज्ज्ञ जागीच ठार तर कारमधील इतर चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुकळी गावाजवळ बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडला.डॉ.संदीप काशीनाथ वानखेडे (३७) रा.साखरा असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तर डॉ.संभाजी डोगे, डॉ.आशीष उगले, डॉ.श्रीराम रावते, डॉ.स्वप्नील अग्रवाल असे जखमी डॉक्टरांची नावे आहे. बुधवारी रात्री कार क्र.एम.एच.२९/ए.आर.-४३४९ ने सर्व डॉक्टर महागाववरून उमरखेडकडे येत होते. त्यावेळी सुकळी गावाजवळ अज्ञात वाहनाने कारला धडक दिली. त्यात बालरोग तज्ज्ञ डॉ.संदीप वानखेडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात ते जागीच ठार झाले, तर कारमधील इतर चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार प्रकाश देवसरकर, अॅड.संतोष जैन, डॉ.अरुण बंग यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सर्व जखमींना उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.बालरोग तज्ज्ञ असलेले डॉ.वानखेडे हे तालुक्यातील साखरा गावचे रहिवासी असून उमरखेड येथे त्यांचा दवाखाना आहे. गोरगरिबांना नि:शुल्क सेवा देणारे डॉक्टर म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृद्ध धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.वानखेडे यांच्या मागे पत्नी डॉ.सारिका वानखेडे, मुलगी, आई, वडील आणि भाऊ अॅड.श्यामराव वानखेडे असा परिवार आहे. (शहर प्रतिनिधी)
अपघातात बालरोग तज्ज्ञ ठार
By admin | Published: February 03, 2017 2:11 AM