पाणीटंचाईची चाहूल : ५० गावातील नागरिक होणार प्रभावित उमरखेड : विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र गत काही दिवसापूर्वी कोरडे पडले असून यामुळे उमरखेड तालुक्यातील ५० गावात पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. जनावरांच्या पाण्यासह विविध समस्या निर्माण होणार आहे.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा यावर्षी पुन्हा कोरडी पडली आहे. गत काही वर्षांपासून पैनगंगा नदी कोरडी पडत असल्याने नदी तीरावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षीही पैनगंगा कोरडी झाल्याने भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोली संगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरुस, देवसरी, कारखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी-बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या नदीच्या काठावर गावागावातील नळ योजना आहे. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच पैनगंगेचे पात्र कोरडे पडायला लागले होते. नदी पात्रात ठिकठिकाणी डबके साचले आहे. आता तर काही भागात नदीचे वाळवंट झाले आहे. याच पैनगंगा नदीवर मोटारपंप लावून अनेक जण रबीचा हंगाम घेतात. परंतु नदी आटल्याने सिंचन करणे कठीण झाले आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. पूर्वी बाराही महिने वाहणारी पैनगंगा इसापूर येथे धरण बांधल्यापासून उन्हाळ्यात आटायला लागली आहे. तर पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडल्याने पुराचा फटका सहन करावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. तब्बल तीन महिने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होतो. पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने विदर्भातील ५० आणि मराठवाड्यातील ३० गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. यावेळी नदीच्या तीरावरील नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पैनगंगा नदी पात्रला आले वाळवंटाचे रुप
By admin | Published: February 20, 2017 1:28 AM