घोन्सा : परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.घोन्सा येथील ३३ के.व्ही. क्षमता असलेल्या उपकेंद्राअंतर्गत तीन फिडर येतात. त्यामध्ये साखरा, खडकडोह, सुसरी पेंढरी येथे फिडर आहे. त्यावरून परिसरातील एकूण ३८ ते ४0 गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामधील जवळपास चार ते पाच गावांत गावठाण फिडर योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना कार्यान्वित असताना सुध्दा येथे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शासनाची गावठाण फिडर योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जेथे गावठाण फिडर योजना कार्यान्वित करण्यात आली, तेथेसुध्दा जवळपास सहा तासांचे भारनियमन केले जात आहे. अनेक गावांमध्ये ही गावठाण फिडर योजना सुरू झाली नाही आणि ती येणार्या पावसाळ्यापर्यंतसुध्दा सुरू होणार नाही, अशी माहिती येथील कनिष्ठ अभियंत्यांनी दिली. तसेच भारनियमनाव्यतिरिक्तसुध्दा येथे वीज गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावेळीही भारनियमनात कुठलाही फेरबदल केला जात नाही. या भारनियमनाविषयी अधिकार्यांना विचारले असता, ते देयकाच्या वसुलीनुसार प्रत्येक गावाचा ग्रुप ठरविण्यात आल्याचे सांगतात. त्यानुसार भारयिनमन करण्यात आल्याचे सांगून ते ग्राहकांची बोळवण करतात. ज्या ग्राहकांनी वीज देयक भरले नाही, त्यांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित करण्यात येतो. परिणामी वसुली मात्र १00 टक्के होताना दिसत आहे. ही सत्य परिस्थिती असताना अधिकारी मात्र ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देताना दिसत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांना थंड हवेची आवश्यकता असते. परंतु त्याचवेळी वीज गुल होत असल्यामुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यातून उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता स्फळट होण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)
भारनियमनात होरपळली जनता
By admin | Published: June 05, 2014 12:03 AM