दारव्हा : शहरात खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शिकवणी वर्गामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना विविध कारणांमुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत आहे. काही दिवस ऑनलाइन वर्ग घेण्यात आले; परंतु पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शिकवणी वर्ग भाड्याच्या जागेत घेतले जात असल्याने त्याचा फटका बसण्यासोबत दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने खासगी शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बारावीचा नवीन अभ्यासक्रम आला आहे. त्याची पुस्तके ऑनलाइन मिळत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १४ ते १५ महिने लागतात. या सर्व समस्यांचा विचार करता शासकीय नियम, अटींवर खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष उमेश जामदारकर, उपाध्यक्ष अनिल ठाकरे, सचिव आशिष देशमुख, कविश्वर सोनोने, सुनील वानखेडे, माधवी नरवडे, राम मते, राहुल सरतापे, राजू नाटकर, पुर्नेद्र येळणे, नीलेश चौधरी आदी उपस्थित होते.