ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत काही वर्षापूर्वी थोडीजरी वाढ झाली तरी सर्वत्र गोंधळ उडून आंदोलनाची भाषा बोलली जायची. नागरिक रस्त्यात उतरायचे. परंतु आता दररोज भाव बदलत असल्याने नागरिकांना दरवाढीचा थांगपत्ताही लागत नाही. रविवारी पेट्रोलचे दर ८३ रुपये १६ पैसे तर डिझेल ६९ रुपये ७६ पैश्यांवर गेले. पेट्रोल दरवाढीच्या इतिहासातील हा उच्चांक होय. डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या (दररोज ठरणारे भाव) निर्णयानंतर पेट्रोलच्या दरात तब्बल १७ रुपये वाढ होऊनही याविरुद्ध बोलायला कुणीही तयार नाही.गत काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती हे कारण त्यामागे सांगितले जात आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव दरदिवशी ठरतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत जशी वाढते तशाच प्रकारे पेट्रोल आणि डिझेलचही महाग होत जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे प्रति बॅरल दर ७३ डॉलर आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता असून असे झाल्यास पेट्रोल १०० रुपये लिटरवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.यवतमाळात रविवारी पेट्रोलचा दर ८३ रुपये १६ पैसे होता. पेट्रोल दरवाढीच्या इतिहासातील ही विक्रमी दरवाढ आहे. कधीही पेट्रोलचे एवढे भाव वाढले नव्हते. या दरवाढीने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भरमसाठ दर वाढल्यानंतरही कुणी याविरुद्ध ब्रसुद्धा काढायला तयार नाही. याचे कारणही तसेच आहे. दररोज किंमतीत होणाऱ्या चढउतारामुळे दरवाढीचा थांगपत्ताच लागत नाही. केंद्र सरकारने १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्युल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाईज रिटेल फ्यूल प्राईस सिस्टीमची सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अपवाद वगळता वाढच झाली आहे. हा निर्णय झाला तेव्हा यवतमाळात पेट्रोलचे दर ६६ रुपये ३१ पैसे होते. गत नऊ महिन्यात २० ते ४० पैसे दरवाढ करीत पेट्रोलचा दर तब्बल ८३ रुपये १६ पैशावर जाऊन पोहोचला. पेट्रोलच्या दराचा हा आजवरचा उच्चांक असून याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे.किंमत ठरविताना पारदर्शकतेचा अभावकच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल तयार करण्यासाठी किती खर्च येतो, कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर त्यात आॅईल कंपन्यांचा किती नफा असतो हेही कुणी सांगत नाही. तेलाची किंमत ठरविण्याबाबतही पारदर्शकता नसल्याचे बोलले जाते. यातून सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा कापला जातो.बॅरलचे दर कमी तरीही दर उच्चांकीकेंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०५ डॉलर पर्यंत गेले होते. त्यावेळेस पेट्रोलचे दर ७० रुपये प्रति लिटरपर्यंत होते. त्या तुलनेत आता कच्च्या तेलाचे दर ७३ डॉलर प्रति बॅरल झाले आहे. तरीही पेट्रोल, डिझेलचे भाव ८३ रुपये १६ पैसे असे भरमसाठ वाढले आहे. या दरवाढीचा फटका सर्व सामान्य ग्राहकांना बसत आहे. कच्च्या तेलाचे भाव कमी असतानाही किमती वाढण्यामागचे कारण म्हणजे विविध कर होय. ग्राहक पेट्रोलसाठी जितकी किंमत देतो त्यातील ५० टक्के भाग केंद्र आणि राज्य सरकारचा असतो. यामुळेच कच्च्या तेलाचे दर कमी असूनही पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी असल्याचे सांगितले जाते.
पेट्रोल ८३.१६ तर डिझेल ६९.७६ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:15 PM
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत काही वर्षापूर्वी थोडीजरी वाढ झाली तरी सर्वत्र गोंधळ उडून आंदोलनाची भाषा बोलली जायची. नागरिक रस्त्यात उतरायचे. परंतु आता दररोज भाव बदलत असल्याने नागरिकांना दरवाढीचा थांगपत्ताही लागत नाही.
ठळक मुद्देऐतिहासिक दरवाढ : दररोज दरनिश्चितीच्या नऊ महिन्यात पेट्रोलमध्ये १७ रुपयांची वाढ