लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुस्लीम समाजाविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध नोंदविण्याचे लोन यवतमाळपर्यंत पोहोचले आहे. त्यांना पायदळी तुडविता यावे म्हणून यवतमाळातील बसस्थानक चौकात रस्त्याच्या मधोमध त्यांचे छायाचित्र लावले गेले आहे. त्यावर फ्रान्सच्या वस्तूंचा बहिष्कार करा असे आवाहन केले गेले आहे.शनिवारी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या या जमिनीवर लावलेल्या चित्रांनी नागरिकांचे लक्ष वेधले. बसस्थानक चौकातून गार्डन रोडकडे जाणाऱ्या मार्गावर दोन, तर दत्त चौककडे जाणाऱ्या रोडवर एक छायाचित्र लावले गेले. त्यावरून वाहने व पादचारी जात आहेत.
पोलिसांच्यास्तरावर अद्याप याची दखल घेतली गेलेली नाही. ही छायाचित्रे नेमकी कुणी लावली हेही स्पष्ट नाही. प्राप्त माहितीनुसार फ्रान्समधील एका शाळेमध्ये फ्रिडम ऑफ स्पिचवर शिकविले जात होते. त्या शिक्षकाने वर्गात मोहम्मद पैगंबरांचे २०१५ साली वादग्रस्त ठरलेले एक कार्टुन दाखविले. फ्रान्समध्ये विस्थापित कुटुंबातील विद्यार्थीही या वर्गात होता. त्याला या प्रकाराचा राग आला. त्याने शिक्षकाचा पाठलाग करून त्यांचा खून केला. या घटनेनंतर फ्रान्स सरकारने मुस्लीम समाजाविरोधातील कायदे प्रचंड कडक केले. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र विंग तयार केली. फ्रान्सच्या या भूमिकेचा जगभर आणि विशेषत: मुस्लीम राष्ट्रांमध्ये निषेध नोंदविला जात आहे.
ठिकठिकाणी फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचे चित्र पायदळी तुडविले जात आहेत. कुठे चपलांनी बदडले जात आहे. या निषेध आंदोलनाचे लोन आता यवतमाळातही पोहोचले आहे. भारताने फ्रान्सकडून राफेल लढावू विमाने खरेदी केली. फ्रान्सच्या अशा कोणत्याही वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन यवतमाळात रस्त्यांवर लावण्यात आलेल्या फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या फोटोसोबत करण्यात आले आहे.