घाणीचे साम्राज्य : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष फुलसावंगी : महागाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलसावंगीमध्ये सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागते. ग्रामपंचायतीला वेळोवेळी गावकऱ्यांनी निवेदने दिली. परंतु अद्यापही दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. फुलसावंगी ग्रामपंचायतीत विविध समस्या निर्माण झाल्या आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गावात विविध आजाराच्या साथी निर्माण झाल्या आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील बहुतांश रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सुधाकरराव नाईक, शिवरामजी मोघे महाविद्यालयात जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाण्याचा लोट वाहत असतो. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. याच मार्गावर डाक घर, पुणेश्वर मंदिर आहे. त्यामुळे भाविक, विद्यार्थी, गावकरी या रस्त्यावरून जातात. परंतु त्यांना मोठी कसरत करावी लागते. महिला व वृद्धांना तर येथून जाणे म्हणजे दिव्यच असते. विशेष म्हणजे याच मार्गावर दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. पावसाळ्यात भरणाऱ्या या बाजारात चिखलाचे साम्राज्य असते. चिखलताच व्यापारी आपले दुकाने थाटतात. त्यामुळे खाद्य पदार्थावर चिखल उडतो. ग्राहकही नाईलाजाने या वस्तू खरेदी करतात. गत दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. परंतु अद्यापही दुरुस्ती झाली नाही. उपडाकघर कार्यालयातून ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला लेखी निवेदन दिले असल्याची माहिती उपडाकपाल गजानन घोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) मुख्य रस्त्याचेही तेच हाल फुलसावंगी बसस्थानकावरून गावात येणारा मुख्य रस्ताही चिखलाने माखला आहे. या रस्त्यावरून येताना गावकऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वाहने स्लीप होऊन पडतात. अशीच परिस्थिती गावातील अनेक भागातील आहे. या सर्व प्रकारामुळे गावात साथीचे आजार पसरत आहे.
फुलसावंगीत विद्यार्थ्यांना चिखलात शोधावी लागते वाट
By admin | Published: July 25, 2016 1:00 AM