सशस्त्र हल्ला : व्यापारी जखमी, बाजारपेठ कडकडीत बंद महागाव/फुलसावंगी : येथील कृषी केंद्र चालकाला फोनवरून धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यामुळे धमकी देणाऱ्यांनी चक्क व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करून दुकानातून नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून घटनेच्या निषेधार्थ फुलसावंगीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. फुलसावंगीतील गौरी शंकर कृषी केंद्राचे संचालक संदेश मुत्तेपवार यांना गावातीलच आरोपी शाहरुख उर्फ टप्या याने रविवारी सायंकाळी फोनवरून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या धमकीच्या दूरध्वनीमुळे घाबरलेल्या मुत्तेपवार यांनी गावातीलच मित्र मदन पांडे यांना हकीकत सांगितली. आरोपी शाहरुख हा नेमके पैसे कशासाठी मागतो याचा जाब विचारण्यासाठी हे दोघेही सोमवारी सकाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गेले. तिथे आरोपी शाहरुख व त्याच्या तीन साथीदारांनी वाद घालून सत्तुराने हल्ला केला. यात मदन पांडे यांच्या हाताला व छातीला गंभीर दुखापत झाली. यानंतर हे आरोपी बाजारपेठेत आले. त्यांनी सुरेश जयस्वाल यांच्या दुकानात तोडफोड केली. नंतर संदेश मुत्तेपवार यांच्या माहूर रोडवरील गोदामात जाऊन तिथे दिवाणजी विलास राठोड याला धमकावून काऊंटरची चाबी मागितली. तेथून आठ लाख ७५ हजार रुपयांची रोख घेऊन हे आरोपी पसार झाले. या प्रकरणी संदेश मुत्तेपवार, मदन पांडे, सुरेश जयस्वाल या व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी आरोपी शाहरुख उर्फ टप्या सह तिघांवर खंडणी वसूल करणे, दहशत पसरविणे व दरोडा टाकणे याचा गुन्हा दाखल केला. भरदिवसा बाजारपेठेत चाललेल्या या दहशत नाट्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. गावातील गुंड प्रवृत्तीच्या आरोपींकडून अशा कारवाया होत राहतात. व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकाविले जाते. हा प्रकार होण्यापूर्वी बाजारपेठ परिसर व व्यापाऱ्यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून आरोपींनी पूर्व नियोजित कट रचूनच हा दरोडा घातल्याचे दिसून येते. (लोकमत चमू) संदेश मुत्तेपवार यांच्याकडे तिसरा दरोडासंदेश मुत्तेपवार या व्यापाऱ्याकडे फुलसावंगीत टाकण्यात आलेला हा तिसरा दरोडा आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्या घरुन २५ लाखापेक्षा अधिकची रक्कम चोरीला गेली होती. त्यात बाबर टोळीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यापूर्वीसुद्धा मुत्तेपवार यांच्याकडे चोरी झाली होती आणि आता सोमवारी सकाळी पुन्हा त्यांच्याच गोदामातून रोख रक्कम नेण्यात आली. यामुळे हे कुटुंब पूर्णत: दहशतीत आले आहे. घटनेनंतरही पोलीस काहीच करीत नसल्याने तक्रार कशासाठी द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गांभीर्य ओळखून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बनसल यांनी महागाव ठाण्यात ठाण मांडले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्यात यवतमाळातील आरोपीचासुद्धा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फुलसावंगीच्या व्यापाऱ्याचे भरदिवसा नऊ लाख लुटले
By admin | Published: February 28, 2017 1:20 AM