यवतमाळ : दारव्हा येथून प्रवासी घेवून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीकअप वाहनाने वळणावर जोरदार धडक दिली. पीकअप छतावर जाड प्लास्टिक पाईप भरलेले होते. या पाईपमुळे एसटी बसचा पत्रा चिरला गेला. या अपघातात दोन मुली ठार झाल्या. तर १२ प्रवासी जखमी आहे. हा अपघात बुधवारी दुपारी कामठवाडा गावाजवळ गोकी मंदिर परिसरातील वळणावर घडला. जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.पायल गणेश किरसान (८) रा. दहेली ता. दारव्हा, पल्लवी विनोद घरडिंकर (१७) रा. लाडखेड या दोन मुलींचा अपघातात मृत्यू झाला. तर सुनंदा सुभाष मांजरे रा. मुगुरपूर जि. वाशिम, कुंदन काशीनाथ मांगुळकर रा. लाडखेड, सुभाष कवडूजी मांजरे (७०) रा. मुगुरपूर जि. वाशिम, लीला महादेव किरसान (६०) रा. दहेली, कोमल मारोती किरसान (३) रा. दहेली, सचिन अशोक कोरडे (३४) रा. बोरीअरब, कुसुम अशोक कोरडे (५५) रा. बोरीअरब, नजमाबी शेख राशीद (४०) रा. दारव्हा, रिजवान परवीन शेख इम्रान (४२) रा. दारव्हा, नूर जमाबी रहेमान खान (६०) रा. दारव्हा, सुनीता कडूकर (६५) रा. कारंजा असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील काहींना खासगी रुग्णालया तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या घटनेनंतर लाडखेड ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. एसटी बसला धडक देणाऱ्या पीकअप वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातातील एसटी बसही पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली आहे. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.