एरंडगावची घटना : दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू पारवा : झोके घेण्यासाठी ओढणीचा बांधलेला पाळणा एका चिमुकलीच्या जीवावर बेतला. ओढणीच्या पाळण्याचा गळफास लागून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घाटंजी तालुक्यातील एरंडगाव येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रतीक्षा राजू जुनघरे (१०) असे मृत बालिकेचे नाव आहे. शेतमजुरी करणारे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. प्रतीक्षा एकटीच घरी खेळत होती. गंंमत म्हणून तिने घरातील ओढणीचा झोका बांधला त्यावर ती झोके घेऊ लागली. परंतु काही कळायच्या आत या ओढणीचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. घरी कुणी नसल्याने मदतीसाठीही कोणी धावून आले नाही. यातच या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. दुपारी तिचे आई-वडील घरी आले असता प्रतीक्षा ओढणीच्या पाळण्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार पाहताच आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. त्यावेळी शेजारीही धावून आले. या घटनेची माहिती पारवा पोलिसांना देण्यात आली. प्रतीक्षा जुनघरे ही चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी होती. घरी कुणी नसल्याने तिने सहज म्हणून बांधलेला ओढणीचा झोका तिच्या जीवावर बेतला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
ओढणीचा झोका जीवावर बेतला
By admin | Published: August 01, 2016 12:44 AM