महागाव शहरात चार ठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत.
तहसील कार्यालय, बसस्थानक, युनियन बँक आणि नगरपंचायत कार्यालयासमोर पडलेले भले मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी कित्येक अपघात घडले आहेत. जड वाहतूक करणारी वाहने अपघातग्रस्त होत आहे. अपघातानंतर किंवा नागरिकांची ओरड झाल्यानंतर मुरूम, माती टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. परंतु डांबरीकरणाचे पॅचेस भरून कायमस्वरूपी खड्डे बुजवले जात नाही. त्यामुळे वारंवार खड्डे पडून अपघात नित्याची बाब झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही, याचेच नवल नागरिकांना वाटू लागले आहे. खड्ड्यांमुळे झालेले अपघात, त्यामधून वाहनाचे झालेले नुकसान आणि प्रवासाचे शरीर दुखापतीचे प्रकार, यामुळे प्रशासनाविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. डांबरीकरणाचे पॅचेस करून यावर कायम तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे.