पुसद : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणाबद्दल जनजागृती करून मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुक्यात गावनिहाय नियोजन करण्याची मागणी भाजयुमोने केली आहे.
सध्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. परंतु तेथे योग्य प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लोकांना रोज ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे तेथे योग्य प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्रांवर वाढत्या गर्दीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील अंतर अधिक असल्याने वयोवृद्धांना ये-जा करण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गर्दी टाळण्यासाठी व वयोवृद्धांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावनिहाय लसीकरण शिबिर घ्यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. जिल्हा उपाध्यक्ष राहुल खंदारे पाटील, जिल्हा सचिव सनी देशमुख, तालुकाध्यक्ष शुभम काळबांडे, शहराध्यक्ष सौरव जयस्वाल, विकास राठोड, आशिष चव्हाण आदींनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.