विलास गावंडे
यवतमाळ : दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कृषी शाखेतून प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही वर्षे नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील १३६ कृषी महाविद्यालयांमध्ये आज १,५००हून अधिक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. पहिल्यांदा निवृत्तीचे वय वाढवून ६० करण्यात आले. त्यानंतर ६२ आणि आता ६५ करण्याची तयारी केली जात आहे. या प्राध्यापकांचे वय वाढविणे म्हणजे नवीन लोकांना संधीपासून दूर ठेवणे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
सरकारच्या धोरणामुळे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे. कार्यरत प्राध्यापकांमधून अनेकांच्या निवृत्तीचा काळ जवळ आला आहे. तत्पूर्वी निवृत्तीचे वय वाढवून घेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वारंवार वाढविण्यात सरकारला काय स्वारस्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठात ६० टक्के जागा रिक्त
कृषी विद्यापीठाच्या शिक्षणाचा गाडा केवळ ४० टक्के प्राध्यापक हाकत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून शासनाने शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांना संधी दिली जात आहे. हा प्रकार बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.
प्रस्थापित शिक्षकांचा सेवाकाळ वाढविण्याच्या हट्टापायी हजारो उच्चशिक्षित कृषी पदवीधर बेरोजगार राहात आहेत. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यास आंदोलन केले जाईल. शासनाने रिक्त पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी दिल्यास कृषी पदवीधरांना रोजगार संधी उपलब्ध होईल.
- प्रणव टोम्पे, अध्यक्ष, पदवीधर संघटना