लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या मधात झाड (रोपटे) लावण्याचा प्रत्येकी दर २७०० रुपये देण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भाजपाच्या एका ‘टेक्नोसॅव्ही’ कार्यकर्त्याला हा कंत्राट दिला गेला. याच कार्यकर्त्याला जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातही चौपदरीकरण होणाऱ्या अन्य रस्त्यांचेही प्लॅन्टेशनचे कंत्राट मिळणार असल्याची माहिती आहे.यवतमाळ ते बाभूळगाव या मार्गावरील चौपदरीकरण करण्यात आले. पोस्ट आॅफीस चौक ते करळगाव घाट या अंतरातील हे चौपदरीकरण झाले. या रस्त्यावर सहा फुटाच्या पाईपमध्ये काटसावर, कडूनिंब, गुलमोहर या सारखी झाडे लावली जात आहे. या प्रत्येक झाडासाठी तब्बल २७०० रुपये मोजले जात आहे. झाड लावणे व तीन वर्ष त्याची देखभाल करणे ही जबाबदारी त्यात समाविष्ट आहे. सेल्फ ड्रीपच्या नावाखाली हा वाढीव दर मिळविण्यात आला. पोस्ट आॅफीस ते करळगाव आणि त्यापुढे करळगाव ते बाभूळगाव असा कंत्राट आहे. करळगाव ते बाभूळगाव दरम्यान ८०० झाडे (रोपे) लावले जाणार असून त्याचे बजेट २२ लाख रुपयांचे असल्याची माहिती आहे. पोस्ट आॅफीस ते करळगाव घाट या अंतरातील बजेट वेगळेच आहे.नेत्यासाठी उपद्रवमूल्य ठरणाºया भाजपाच्या या कार्यकर्त्याला प्लॅन्टेशनचा हा कंत्राट देण्यात आला आहे. त्याचे उपद्रवमूल्य आणखी वाढू नये व तो गुंतून रहावा या हेतूने त्याला हे कंत्राट दिले गेले असल्याचे सांगितले जाते. हा कार्यकर्ता रेकॉर्डवर नसला तरी त्याने आपल्याला ‘ग्रीनरी’चा ‘अनुभव’ असल्याचे दाखविले आहे. याच कार्यकर्त्याला घाटंजी ते यवतमाळ-अकोलाबाजार या मार्गाचाही कंत्राट देण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यातील वलगाव ते अमरावती तसेच समृद्धी महामार्गावरील प्लॅन्टेशनचा कंत्राट मिळविण्यासाठीही या कार्यकर्त्याने मोर्चेबांधणी केल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येते.ग्रीनरीचा अनुभव व प्रेझेन्टेशनच्या बळावर हे कंत्राट मिळविले गेले आहे. या कंत्राटामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पक्षातील ‘विरोधकांना’ नेत्यांकडून एवढा भाव का, असा सवाल भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत.पैसा उधळूनही झाडे वाढेना !धामणगाव रोडवर प्रत्येक झाडाला २७०० रुपये दर देऊनही झाडे वाढत नसल्याची ओरड आहे. या झाडाच्या देखभालीसाठी बाभूळगावात पाच हजार रुपये महिन्याने एका युवकाला नियुक्त केले आहे. तो अधूनमधून केव्हा तरी टँकरने या झाडांना पाणी देताना दिसतो. भाजपा कार्यकर्त्याला मिळालेल्या या प्लॅन्टेशनच्या दराची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
एक झाड लावण्याचा दर तब्बल २७०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 9:27 PM
चौपदरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या मधात झाड (रोपटे) लावण्याचा प्रत्येकी दर २७०० रुपये देण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भाजपाच्या एका ‘टेक्नोसॅव्ही’ कार्यकर्त्याला हा कंत्राट दिला गेला.
ठळक मुद्देचौपदरी रस्त्यावरील ‘प्लॅन्टेशन’ : भाजपाच्या ‘टेक्नोसॅव्ही’ कार्यकर्त्याला खैरात