पुसद : तालुक्यात ६९ हजार ८२९ हेक्टरवर पीक लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ५१ हजार ६०८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढला असून, कपाशी दुसऱ्या स्थानावर आहे.
तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८२९ हेक्टर आहे. बराच भाग डोंगराळ असल्याने या भागातील शेतजमीन हलकी व मुरमाड आहे. त्यात सिंचन व्यवस्था पाहिजे, त्या प्रमाणात नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. परंतु मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, सोयाबीन ही कडधान्य, ज्वारी, बाजरी, मका आदी तृणधान्य, कापूस व ऊस आदी नगदी पिके घेतली जातात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पीकनिहाय क्षेत्र प्रस्तावित केले. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा २४ हजार ५०० हेक्टर, तूर चार हजार ९००, मूग ५५०, उडीद ५६२, कापूस १८ हजार ७००, तूर चार हजार ९००, ऊस १६२, ज्वारी एक हजार १००, मका १५, तीळ ११, इतर पिके एक हजार सहा, तर सर्वात कमी बाजरी दोन हेक्टर अशी खरिपाची पेरणी होणार आहे. तालुक्यात तूर्तास ५१ हजार ६०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७३.०९ टक्के असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी दिली.
बॉक्स
पाच हजार मेट्रिक टन खत उपलब्ध
तालुक्यात सध्या पाच हजार ५०९ मेट्रिक टन खते उपलब्ध आहेत. सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाबीजच्या सोयाबीन बियाणांसाठी तालुक्यातील २४७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. सध्या सोयाबीन बियाणांची टंचाई नाही, असे शुभम बेरड यांनी सांगितले.