यवतमाळ : दोन-दोन महिने लेट होणारे पगार आता शिक्षकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. मे महिन्याचाही पगार साधारण नवे शैक्षणिक सत्र सुरू होता-होता मिळेल, म्हणून शिक्षक देव पाण्यात बुडवून बसले होते. पण गुरुवारी सायंकाळी सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कुणीही मागणी न करता, निवेदन न देता चक्क पगार खात्यात जमा झाले. तेही महिना संपूण्याच्या दोन दिवसांपूर्वीच !
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळांमध्ये साडेसात हजार शिक्षक कार्यरत आहेत. हे सारे शिक्षक दरमहिन्याला वेळेवर पगार व्हावा म्हणून आपापल्या संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाचे उंबरठे झिजवत असतात. कधी शिक्षणाधिकारी, कधी वित्त व लेखा अधिकारी तर कधी कोषागार कार्यालयात निवेदने देत राहतात. तरीही ‘टेबल’ सांभाळणारे कर्मचारी ताकास तूर लागे देत नाही. पगार हमखास लेट होतात. डीडीओ वनपासून डीडीओ टूपर्यंत पगार बिले जाता-जाता महिना संपतो. त्यानंतर पंचायत समितीतील कार्यवाही अन् पुढे जिल्हा परिषदेतली कार्यवाही यात वेळ निघून जातो. सारी प्रक्रिया आटोपल्यावर कोषागार कार्यालयातून पगार रवाना होते. परंतु, आता शिक्षकांच्या पगारासाठी स्टेट बँकेची ई-कुबेर प्रणाली वापरली जात आहे. त्याचे संनियंत्रण हैदराबादवरुन केले जाते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने पंचायत समिती ते जिल्हा परिषदेतील यंत्रणेला अगदी वेळेवर कामे पूर्ण करावी लागतात. त्याचाच परिणाम म्हणून मे महिन्याचे पगार उशिरा तर सोडाच अगदी महिना संपण्याच्या आत जमा झाले आहेत.
खाते क्रमांकाची खात्री
पगाराची ई-कुबेर प्रणाली वापरताना एखाद्या कर्मचाऱ्याचा खाते क्रमांक जरी चुकला तरी संपूर्ण शिक्षकांचे पगार खोळंबतात. हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अगदी शाळानिहाय आढावा घेत प्रत्येक शिक्षकाचे खाते क्रमांक तपासूनघेतले. त्याची खातरजमा करुन घेण्यात आली. त्यातून मे महिन्याचा जूनमध्ये जमा होणार पगार चक्क ३० मे रोजीच जमा झाला
महिन्याच्या एक तारखेचा नियम
सर्व शिक्षकांचे पगार महिन्याच्या एक तारखेलाच त्यांच्या खात्यात जमा करावे, असा नियम आहे. याबाबत २०१६ मध्ये राज्य शासनाने जीआरही निर्गमित केला. परंतु, जिल्ह्यात अपवाद वगळता कधीही एक तारखेला पगार जमा झालेले नाही. उलट दोन-दोन महिने विलंब झाला. परंतु, आता ई-कुबेर प्रणालीच्या वापराने एक तारखेच्याही आधी पगार जमा होऊ शकला.