लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साहित्य संमेलन आणि कवितांची मैफल हे समीकरण तसे नेहमीचेच. पण यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवितांसोबत प्रसिद्ध कवींची रेखाटनेही झळकणार आहेत. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ही रेखाटने चितारण्यासाठी अखिल महाराष्ट्रातील प्रस्थापित-नवोदित कलावंतांना संधी दिली जाणार आहे.यवतमाळ येथे जानेवारी महिन्यात ११, १२ आणि १३ तारखेला ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. प्रस्थापित तसेच निमंत्रितांच्या कविसंमेलनासोबतच ‘कविकट्टा’ हा नवा प्रकारही आयोजित करण्यात आला आहे. या कविकट्ट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिवंगत कवींच्या स्मृतीला उजाळा दिला जाणार आहे. त्याकरिता त्यांची एक कविता आणि कवीचे व्यक्तीचित्र रेखाटन (स्केच) संमेलनस्थळी झळकणार आहे. हे रेखाटन साकारण्याची, तसेच कॅलिग्राफीमध्ये कविता लिहून देण्यासाठी राज्यासह स्थानिक कलावंतांना संधी दिली जाणार आहे.९ आणि १० डिसेंबर रोजी कलावंतांना प्रत्यक्ष संमेलन कार्यालयात येऊन हे रेखाटन तयार करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा कलावंतांचा संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी दिली.
साहित्य संमेलनात झळकणार कवितांसोबत कवींची रेखाटने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:05 PM