लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : जुन्या वादातून तरुणांमध्ये भांडण पेटले. यात पाच जणांनी मिळून एका तरुणाला बळजबरीने विषारी औषध पाजले. हा गंभीर प्रकार तालुक्यातील घाटाना येथे घडला. विष पोटात गेल्याने तडफडणाऱ्या तरुणाला कसेबसे रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्याचा मृत्यू झाला. अंकुश विजय जाधव (२८) रा. घाटाना ता. यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संजय दासू चव्हाण, चेतन संजय चव्हाण (२५), चिरंजीव संजय चव्हाण (२०), रोशन मनोज चव्हाण (२२) आणि करण मनोज चव्हाण (२०) रा. लोणी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. २२ मार्च रोजी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने विष पाजले. नातेवाईकांनी त्याला तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पवन राठोड, पीएसआय भास्कर दरणे, धनंजय शेकदार, गणेश आगे, नीलकमल भोसले, अक्षय डोंगरे यांनी केली.
खुनाला गावगाड्यातील वादाची किनार - या प्रकरणी अंकुशचे वडील विजय रामलाल जाधव (५१) रा. घाटाना यांनी वडगाव जंगल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सुरुवातीला या प्रकरणात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३०७ नुसार गुन्हा नोंदविला गेला. मात्र अंकुशचा मृत्यू झाल्याने आता यात ३०२ हे खुनाचे कलमही दाखल करण्यात आले आहे. - अंकुशला मारणारे पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. गावगाड्याचा वाद विकोपाला गेल्याने प्रकरण खुनापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तविली जात आहे.