यवतमाळ : पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथे सोमवारी निकाहानंतर जेवणातून१६० वऱ्हाड्यांना विषबाधा झाली. सर्वांवर शेंबाळपिंपरी, पुसद व नांदेड जिल्ह्यातील कळमनुरी येथे उपचार सुरू आहे. यापैकी आठ ते दहा जण गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
अदमदखाॅ असुद्दीनखाॅ यांच्या मुलीचा निकाह होता. नांदेड जिल्ह्यातील कळमनुरी येथील वर आणि वऱ्हाडी निकाहसाठी दाखल झाले. एका उर्दू शाळेत दुपारी निकाह झाला. त्यानंतर वऱ्हाड्यांना जेवण देण्यात आले. निकाहला जवळपास हजारच्यावर वऱ्हाडी उपस्थित होते. जेवणानंतर यापैकी जवळपास २०० जणांना विषबाधा झाली. जेवणानंतर अनेकांना उलट्या झाल्या. काहींना मळमळ सुरू झाली. काही वऱ्हाडी मंडळी कळमनुरी येथे परतली होती. त्यांनाही तेथे पोहोचल्यानंतर उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. आठ ते दहा गंभीर वऱ्हाड्यांना रुग्णवाहिकेने पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.