ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधेचा रुग्ण हा शंभर टक्के ठणठणीत बरा होतो, असे विषबाधित रुग्णांवर उपचार करणाºया खासगी व शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगतिले.यवतमाळ जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून १९ जणांचा बळी गेला. चारशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. त्यातील अनेक रुग्णांना अशक्तपणा, हातापायाला थरकाप सुटणे, भोजन कमी होणे, दृष्टी तात्पुरती अधू होणे, अंगदुखी आणि मळमळ होऊन उलटी होणे आदी लक्षणे दिसत आहे. आपल्या अंगात विषाचे अंश असतील आणि त्यामुळेच ही लक्षणे दिसत आहे, असे समजून रुग्णांसह घरची मंडळीही घाबरून गेली आहे. कोणतेही माहिती नसल्याने रुग्ण पराकोटीचे दडपणाखाली आहे. परंतु ही लक्षणे विषबाधेची नसून उपचारादरम्यान दिलेल्या औषधाचे असतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘लोकतम’शी बोलताना सांगितले. विषबाधेचा आघात मानवी चेता संस्था (न्युरोमस्क्यूलर) आणि स्नायूवर होतो. हृदयाची गतीही कमी होते. ही गती कायम ठेवण्यासाठी रुग्णाला अॅट्रोफिन हे औषध दिले जाते. या औषधाचा परिणाम बराच काळ शरीरावर राहतो. रुग्ण घरी गेल्यानंतर काही लक्षणे दिसू लागतात. परंतु घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. विषबाधित रुग्ण हा ठणठणीत बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच विषबाधितांना अॅन्टी डोज म्हणून पाम ही औषधी दिली जाते. अलिकडच्या काळात या औषधीचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा ही औषधी प्रभावी ठरत नाही.यवतमाळातील जनरल फिजीशियन डॉ. दीपक अग्रवाल म्हणाले, उपचारानंतर शरीरात विषाचा कोणताही अंश राहणे शक्य नाही. आपले शरीर संपूर्ण विष बाहेर टाकते. तसेच किडणी, यकृत, पचनसंस्था आदी अवयवांवर विषबाधेचा परिणाम होण्याचीही शक्यता नगन्य असते. रुग्णांनी आणि नातेवार्इंकानी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. त्रास मोठ्या प्रमाणात जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ.अग्रवाल यांनी सांगितले.मानसिक आधार हवाविषबाधा झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर अनेकदा रुग्णांना झटके येतात. परंतु हे झटके विषबाधेचे नसतात. तंबाखू अथवा दारूचे व्यसन असणाºयांत असे लक्षण दिसते. दवाखान्यात उपचारादरम्यान तंबाखू आणि दारू वर्ज्य असते. त्यामुळे निकोटीन किंवा अल्कोहोल विड्रॉलचे झटके येतात. काहींना अस्वस्थ वाटू शकते. परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नसते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.बळीराजा चेतना अभियानाचे वराती मागून घोडेजिल्ह्यात फवारणीचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता शासकीय यंत्रणेसह बळीराजा चेतना अभियान शेतकºयांना फवारणीचे ‘शास्त्रशुद्ध’ मार्गदर्शन करीत आहे. हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असाच आहे. साधारणत: जुलै महिन्यापासून फवारणीला प्रारंभ होतो. त्याच काळात विषबाधा झाल्याचे पुढे आले. नंतरच्या काळात १९ जणांचा बळी गेला तर चारशेच्यावर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. तोपर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेचे फवारणीकडे लक्ष नव्हते. विशेष म्हणजे खास शेतकºयांसाठी स्थापन झालेल्या बळीराजा चेतना अभियानही यापासून अनभिज्ञ होते. सर्वप्रथम ‘लोकमत’ने फवारणीतील विषबाधेचा विषय मांडला होता. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. आता जो तो शेतकºयांना फवारणीसाठी मार्गदर्शन करीत आहे. परंतु सुरुवातीच्या काळातच फवारणीबाबत मार्गदर्शन केले असते तर १९ जणांचा बळी गेला नसता. बळीराजा चेतना अभियानानेही या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्षच केले. आता फवारणीच्या मार्गदर्शनापेक्षा शेतकºयांना समूपदेशनाची गरज आहे. मात्र जो तो पाठीवर पंप घेऊन शेतकºयांना फवारणीचे मार्गदर्शन करीत आहेत.फवारणीतून असो की कोणत्याही विषबाधेत रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास तो ठणठणीत बरा होतो. विषबाधेचे कोणतेही दीर्घकालीन परिणाम रुग्णांच्या शरीरावर होत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही काही काळापुरतीच असतात. हळूहळू ती कमी होऊन रुग्ण बरा होतो. तसेच विषबाधेचा उपचार फार महागडाही नसतो. या काळात रुग्णांना समजून घेऊन त्यांना धीर देणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन बेलेअतिदक्षता उपचार तज्ज्ञ यवतमाळ
विषबाधेचा रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:00 PM
योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात.
ठळक मुद्देगरज समुपदेशनाची : उपचारानंतरच्या लक्षणांनी घाबरु नका, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती