दिग्रस (यवतमाळ) : दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळ्याचा सण ग्रामीण भागात अतिशय उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यासोबत वर्षभर राबराब राबणारा शेतकऱ्याचा सखा असलेल्या बैलाची मनोभावे पूजा करण्यात आली. त्याला स्वच्छ अंघोळ घालून मटाटी, झूल अन् घुंगरांनी सजवून पोळ्यात आणले गेले होते.
तालुक्यात यावर्षी तीथीनुसार दोन दिवसांची अमावस्या आल्यामुळे शेतकऱ्यांनी गुरूवारी ‘सखा’ सजवून तोरणाखाली नेला. शहरातील पोळा मैदानापासून शिवाजी चौकापर्यत भरलेल्या पोळ्यात चिमुकल्यांसह युवक व नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पोलिस पाटलांच्या हस्ते मानाच्या जोडीचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर पोळ्याच्या तोरणाखालून निघालेल्या बैलजोड्यांचे पूजन घरा-घरात करण्यात आले. यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविण्यात आला.
यावर्षीच्या पोळ्यातील झडत्यांना सामाजिक प्रबोधनाची किनार पाहायला मिळाली. झडतीसोबत विविध सामाजिक संदेश बैलाच्या पाठीवर लिहिण्यात आले होते. महागाव तालुक्यातील धनोडा आणि पुसद तालुक्यातील कन्हेरवाडी येथेही पोळ्या राजकीय झडत्यांनी रंग भरला होता.