वडकी (यवतमाळ) : चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना वडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री वडकी पोलिसांनी केली. येथील जवादे ले-आऊटमधील एका बंद घराच्या आवारात प्रवेश करून हे चोरटे चोरीच्या प्रयत्नात होते. नागरिकांची समयसूचकता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरटे जाळ्यात अडकले.
खैरी मार्गावरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मागील भागाला असलेल्या जवादे ले-आऊटमधील बंद घराच्या आवारात दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती रात्रगस्तीवर असलेले पोलिस अंमलदार अरुण भोयर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहून चोरटा पळून जात असताना पकडले. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन रोडच्या बाजूला लपून बसला होता. त्यालाही मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
बळीराम शेषराव कुरडे (३८) आणि लकी रामभाऊ भोगे (२४) दोघेही रा.वडद ता.महागाव, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंगझडतीत त्यांच्याजवळ पेंचिस, लाठी आढळून आले. त्यांच्याजवळून एक दुचाकी, दोन मोबाईल आदी ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमलदार अरुण भोयर, अरविंद चव्हाण, चालक आडपावार यांनी पार पाडली. पुढील तपास वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात जमादार रमेश मेश्राम, किरण दासरवार करीत आहेत.