लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीने धाक दडपशाही करून अग्नीशस्त्रांचा वापर करून भूखंड बळकावल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. बोगस कागदपत्रांचा वापर केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे अशा भूखंड माफियांच्या संघटित टोळीचा बीमोड करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, पोलीस प्रशासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी गुरुवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भूखंड बळकावल्याच्या चार प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त ज्या सामान्य नागरिकांना संघटित गुन्हेगारांच्या टोळीने धाक दाखवून जमीन, प्लाॅट बळकावले, अनधिकृतपणे भूखंडावर ताबे मिळवले, संबंधितांना धमकावण्यासाठी अग्नीशस्त्राचा वापर केला, अशा घटनेतील पीडितांनी निर्भयपणे पोलिसांकडे प्रकरण द्यावे, यासाठी एसआयटीची (विशेष समिती) स्थापना केली आहे. एसआयटीकडून प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल. याकरिता नोंदणी कार्यालय, नगर परिषद, ग्रामपंचायत, महसूल विभाग यासह संबंधित सर्व कार्यालयांची मदत घेण्यात येईल. खोटे दस्तऐवज तयार केल्याचे आढळल्यास ते रद्द करण्यासाठीही एसआयटीकडून मदत करण्यात येईल. बोगस फेरफार रद्द करण्याकरिता दिवाणी दावे दाखल करण्यासाठी एसआयटीकडून कायदेशीर मदतही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारचा अन्याय सहन न करता निर्भयपणे तक्रारी कराव्यात, त्यांचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. संघटितपणे गुन्हेगारी टोळी स्थापन करून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता बळकावणाऱ्यांविरोधात पोलीस निडरपणे कारवाई करत आहेत. कायदेशीर बाबींची पडताळणी करून तटस्थपणे वास्तवाचा शोध घेऊन दोषींना शासन होईल, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली.
टोळीच्या म्होरक्याला अटक करणाऱ्यांना बक्षीस - संघटित गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड आनंद उर्फ बंटी द्वारकाप्रसाद जयस्वाल, त्याचा साथीदार गोपाल दीपकचंद बख्तीयार या दोघांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून अटक करणाऱ्या पोलीस पथकाला एसपींनी ५० हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही अटकेची कारवाई सायबर सेलचे प्रभारी अमोल पुरी, एलसीबीचे गजानन कऱ्हेवाड, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, उल्हास कुरकुटे, मोहंमद भगतवाले, पंकज गिरी, प्रवीण कुठे व पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी पार पाडली आहे.
एसआयटीची स्थापना - भूमाफियांविरोधातील कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ शहर ठाणेदार व अवधूतवाडी ठाणेदार, भरोसा सेल प्रमुख यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे. यापुढे ही एसआयटी स्वतंत्रपणे काम करणार आहे.