यवतमाळ : दररोज चोरीच्या घटना घडूनही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहून नागरिक सतर्क झाले. मात्र पोलिसांना आपल्या अतिउत्साही कारभाराने नागरिकांच्या या सतर्कतेलाही सुरूंग लावला. यवतमाळातील वैद्यनगर परिसरात हा प्रकार घडला.
रात्री १.३० वाजताची वेळ. यवतमाळच्या वैद्यनगर परिसरातील नागरिक गाढ झोपेत. तेवढ्यात चार चोरटे एका अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी फ्लॅटच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या. त्यानंतर एका घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र आवाजाने शेजारील महिलेला जाग आली. तिने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला परंतू दार बाहेरून चोरट्यांनी बंद केले होते. म्हणून तिने खिडकीतून बाहेर पाहून चोरटे शिरल्याचे खात्री केली. प्रसंगावधान राखत लगेच चार्ली कमांडोंना फोन लावला. अपयश झाकण्याची आयतीच संधी चालून आल्याने अतिउत्साहात चार्ली पथक तेथे पोहोचले. मात्र त्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यांच्या दुचाकींचा आवाज आणि पेहरावावरून चोरटे सतर्क झाले आणि त्यांनी पोलिसांना हुलकावणी देत पोबारा केला.
यवतमाळ शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री २० घरे फोडण्याचा रेकॉर्ड चोरट्यांनी केला आहे. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहेत. पोलिसांच्या या नाकर्तेपणाने आता नागरिक स्वत:च सतर्क झाले आहेत. कुठेही संशय आला की पोलिसांना कॉल केला जात आहे. मात्र पोलीस नेहमीच्याच साहेबी अविर्भावात पोहचून नागरिकांच्या सतर्कतेचे खोबरे करतात. गुरूवारी रात्री वैद्यनगरातील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये हा प्रकार सिध्द झाला.हे चोरटे संख्येने चार होते. तोंडाला कापड, अंगात अंगरखा नव्हताच. केवळ काळ्या रंगाच्या चड्डया घातल्या होत्या. या चोरट्यांना रंगेहाथ अटक करण्याची संधी चार्ली कमांडोना चालून आली होती. मात्र सिनेस्टाईल अटकेच्या नादात त्यांनी ही संधी दौडविली. (स्थानिक प्रतिनिधी)