यवतमाळ : शहरातील धनदांडगा सावकारच चोरीतील मालाचा खरेदीदार निघाला. एका भंगार व्यावसायिकासोबत संधान साधून या धनदांडग्या सावकाराने कवडीमोल भावात चोरीतील लॅपटॉप व घड्याळ खरेदी केले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने सांगितला. आता हा सावकार मानसिक रुग्ण असल्याचे सोंग करून गुन्ह्यातून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकृत सावकारीचा परवाना असलेल्या धनदांडग्याने थेट चोरीचा मुद्देमाल घ्यावा हे पोलिसांसाठीही धक्कादायक आहे. हरिभाऊ गजानन बजाज उर्फ मुन्ना बजाज रा. कॉटनमार्केट जवळ धामणगाव रोड असे या सावकाराचे नाव आहे. कोट्यवधी रुपयाची संपत्ती असूनही तो चोरी करण्यात आलेली घड्याळे, लॅपटॉप खरेदी करायचा. आता या सावकाराला पोलिसांनी चोरट्यांच्या कबुली जबाबावरून रेकॉर्डवर घेतले आहे. भक्कम पुरावा मिळाल्याने प्रतिष्ठीत म्हणून वावरणारा हा धनदांडगा सावकार अप्रत्यक्षरीत्या घरफोडीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शहरातील मार्इंदे चौकात परिसरात बँक व्यवस्थापक हर्षल महाबुदे यांच्याकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने छडा लावला. यात अभिषेक गुंजाळ (१९) रा. साईमंदिर व शिंदे प्लॉट परिसरातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. या दोन चोरट्यांनी पाच हजार रुपयात चोरीतील लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल भंगार व्यावसायिक मुजाहिद शेख मेहमूद शेख रा. अशोकनगर पाटीपुरा याला विकल्याचे सांगितले. त्यावरून भंगार व्यावसायिक मुजाहिद शेख याला पोलिसांनी अटक केली. चोरीच्या मुद्देमालातील लॅपटॉप व घड्याळ सावकार हरिओम बजाज याला विकल्याचे त्याने सांगितले. तर मोबाईल मनीष वड्डे याला विकला. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल घेणाºया भंगार व्यावसायिकासह तिघांनाही ताब्यात घेतले. ही घटना अवधूतवाडी ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पाचही आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले. सोने खरेदीदार कोण?दरदिवशी होणाऱ्या चोऱ्या-घरफोड्यांमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे नेमके खरेदीदार कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अनेकदा त्यांची नावे निष्पन्न होऊनही पोलीस त्यांना साक्षीदार बनवून सुरक्षा कवच प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून मोठे ‘डिलिंग’ केले जाते. त्यांना ४११ लावणे टाळले जाते.
धनदांडगा सावकार चक्क चोरट्या मालाचा खरेदीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 10:12 PM