तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस : स्फोटक स्थितीचा धोका यवतमाळ : शेवटच्या दिवशी तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले. यावरून या केंद्रांवरील शेतकऱ्यांचा रेटा लक्षात घेता स्थिती स्फोटक होण्याचा धोका वाढला आहे. शासकीय तूर खरेदीसाठी शनिवार, २२ एप्रिल हा शेवटचा दिवस उरला आहे. अखेरच्या दिवशी तूर खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रांना आता बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. आत्तापर्यंत शासकीय तूर खरेदी केंद्राने दीड लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. अद्याप ६० हजार क्विंटलच्यावर तूर केंद्रावर पडून आहे. ही तूर मोजावी म्हणून शेतकरी धडपडत आहे. मात्र मर्यादित मनुष्यबळामुळे खरेदी केंद्रांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करण्याचे पत्र बाजार समित्यांना दिले. याच पत्रात त्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दर्जाची तूर खरेदी करण्यासाठी दबाव येत असल्याचा उल्लेख केला. त्यासाठी शेवटच्या दिवशी रेटा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. यामुळे पोलीस संरक्षण घेण्याचे त्यांनी बाजार समित्यांना सांगितले. त्यानुसार बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. शेतकरी झाले सैरभैर २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीचे पत्र धडकल्याने टोकनवर तूर खरेदी नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ते वाट्टेल त्या वाहनाने तूर केंद्रांवर आणत आहे. प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आहे. या तुरीचे मोजमाप करणेही अवघड झाले. अशा स्थितीत अखेरचा दिवस आल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सरकारची भूमिका दुटप्पी या कठीण प्रसंगी सरकारने शेतकऱ्यांसोबत असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सरकार दुटप्पी भूमिकेत असल्याचा आरोप कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी केला. यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट केले. सर्व सभापतींची २३ एप्रिलला या संदर्भात बैठक होत असून त्यात आंदोलनाची भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)
कृषी बाजार समित्यांनी मागितले पोलीस संरक्षण
By admin | Published: April 22, 2017 1:42 AM