दुचाकी लावण्याचा वाद : गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश दारव्हा : न्यायालय परिसरातील वाहनतळावर दुचाकी लावण्याच्या कारणावरून पोलीस शिपायाने वकिलास करून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता येथे घडली. अॅड़ रुपचंद लक्ष्मणराव कठाणे (३०) रा. रामगाव (रामेश्वर) यांना पोलीस शिपायी श्रावण राऊत याने मारहाण केली. अॅड़ रुपचंद कठाणे हे न्यायालयाच्या आवारात वाहनतळावर दुचाकी उभी करत असताना पोलीस शिपायी श्रावण राऊत यांनी त्यांना ‘अबे गाडी तिकडे लाव’ अशा शब्दात दरडावले. त्यावेळी आपण वकील आहो, जरा चांगल बोला असे कठाणे यांनी म्हटले. एवढ्याच कारणावरून शिपायाने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत खाली पाडून मारहाण केल्याची तक्रार कठाणे यांनी केली. या प्रकाराने संतप्त वकील मंडळींनी तत्काळ वकील संघाची बैठक घेऊन पोलीस ठाणे गाठले. संबंधित शिपायावर कारवाईची मागणी केली. मात्र याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. तुम्ही येथून गेले नाही तर तुमच्यावर गुन्हा नोंदविल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. वकीलावरच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल नोंदविल्याची माहिती मिळाल्याने वकील संघाने कामबंद आंदोलन सुरू करून न्यायालयाला निवेदन सादर केले. यावरून पोलीस शिपायी श्रावण राऊत याच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्याही चौकशीचे आदेश दिल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ एम.डी. राजगुरे, उपाध्यक्ष अॅड़ ए.व्ही. चिरडे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसाची वकिलास मारहाण
By admin | Published: August 07, 2016 1:06 AM