सामाजिक बांधिलकी : २५ कुटुंबांना मदतयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देत पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील २५ कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठीही हातभार लावण्यात आला आहे. पोलीस कल्याण निधीसाठीच्या कार्यक्रमातून अडीच लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. पोलिसांचे वेतन आणि पोलीस कल्याण निधीतून प्रत्येकी अडीच लाख असा पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे येथे आयोजित ‘साज और आवाज’ या कार्यक्रमात सुपूर्द केला.निधी उभारण्यासाठी पोलीस विभागातर्फे सांस्कृतिक, मनोरंजनाचा ‘साज और आवाज’ कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात आला. यातून गोळा झालेल्या निधीतून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देण्यात आली. उमरखेड पाच, पुसद तीन, दारव्हा चार, पांढरकवडा पाच, वणी चार यवतमाळ चार अशा एकूण २५ कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे अडीच लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. पोलीस कल्याण विभागातर्फे कल्याण निधीसाठी आयोजित कार्यक्रमांची तिकीट विक्री व खर्चाबाबतची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटवर प्रसारि केली जाणार आहे.पोलीस विभागाने घेतलेल्या कार्यक्रमाला वणी येथे केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. पांढरकवडा येथे आमदार राजू तोडसाम यांनी अडचणीतील शेतकऱ्यांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. यवतमाळ येथे आमदार डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, कल्पना भराडे, अश्विनी पाटील, पंजाबराव डोंगरदिवे, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अमोल कोळी आदींची उपस्थिती होती. संचालन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आर. डी. वटाणे यांनी केले. पोलीस निरीक्षक प्रजापती, संजय देशमुख, बाळकृष्ण जाधव, नंदकुमार पंत, आगे, मल्लिकार्जून इंगळे, महिपालसिंह चांदा, कऱ्हाळे, राठोड, सहायक पोलीस निरीक्षक राऊत उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलिसांचा शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात
By admin | Published: May 25, 2016 12:13 AM