तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार : पालकमंत्री, एसपींची भेटअकोलाबाजार : यवतमाळ तालुक्याच्या यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांच्या खुनाने सरकार व प्रशासन हादरले आहे. वीरेंद्र यांच्या पार्थिवावर शनिवारी तणाव पूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांनी यावली येथे भेटी देऊन नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. या खुनप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये महादेव टेकाम, हुसेन आत्राम, शंकर अंजीकर (आत्राम), सुदाम शिवणकर, भगवान शिवणकर, दिवाण आत्राम यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पहाटे खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर गावात ४० पोलीस, चार्ली पथक तैनात करण्यात आले. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने स्वत: या तपासावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात वडगाव जंगल पोलीस तपास करीत आहे. शनिवारी वीरेंद्र राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा अमेय याने चितेला भडाग्नी दिला. नागपूर येथील प्रा. मोहन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी एल.एच. पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हरकरे, महेश पवार आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. पालकमंत्री संजय राठोड यांनी गावात भेट दिली. त्यांनी वीरेंद्र यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ते म्हणाले, वीरेंद्र राठोड यांना दारूबंदी समर्थनार्थ वीरमरण आले असून त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शासनासाठी पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना निशाणा बनविले गेले. यातील आरोपींचा युद्धस्तरावर शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. शासन वीरेंद्र राठोड व कुटुंबीयांना न्याय देण्यात कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही संजय राठोड यांनी दिली. यवतमाळ जिल्हा दारूबंदी संबंधी शासन निश्चितच धोरणात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावलीतील कोलाम पोडावर दारूवरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वीरेंद्र राठोड यांचा गुरुवारच्या रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. दारू विक्रीला विरोध हेच प्रमुख कारण या खुनामागे सांगितले जाते. राठोड यांनी दिवाण आत्राम याची दारू वाहतूक करणारी इंडिका स्वत: पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. दिवाण व साथीदारांवर गुन्हेही नोंदविले गेले. तेव्हापासूनच पोलीस पाटील वीरेंद्र यांचा वचपा काढण्याची तयारी सुरू होती, अशी चर्चा गावात आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी त्या रात्री वेळीच दखल घेतली असती तर वीरेंद्र यांचा प्राण वाचला असता, असा संतप्त सूर नागरिकांमधून ऐकायला मिळाला. (वार्ताहर) कॅन्डल मार्चने वीरेंद्र राठोड यांना श्रद्धांजली यवतमाळ तालुक्यातील यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रीला विरोध करतात म्हणून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यवतमाळच्या महात्मा फुले पुतळ्यापासून शनिवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये स्वामिनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, समाजकार्य महाविद्यालय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कारेगाव यावली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलीस पाटलाच्या खुनाने प्रशासन हादरले
By admin | Published: July 05, 2015 2:18 AM